वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या ६ प्रभाग समित्यांमधले २९ क्षेत्रे आजपासून पुढील १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित…

पालघर: राज्य शासनानं कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा १३ मार्चपासून लागू करून खंड ३, ४, आणि ५ मधल्या तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्यातल्या वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात कोव्हीड-१९ च्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी आणि त्याचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ मार्च २०२० च्या आदेशानुसार महानगरपालिका आयुक्तांना सक्षम प्राधिकारी म्हणून नेमण्यात आलं आहे. 

 पालघर जिल्ह्यातल्या वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात दररोज कोव्हीड-१९ चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यानं कोव्हीड-१९ चा संसर्ग वाढू नये यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून प्रभाग समिती कार्यक्षेत्रा मध्यें रुग्ण आढळून आलेल्या प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र कंटेन्टमेंट झोन न करता ज्या प्रभागात रुग्ण संख्या जास्त आहे अशी क्षेत्रे एकत्र करून मोठं प्रतिबंधित क्षेत्र करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतलेला आहे. त्या अनुषंगानं ६ प्रभागसमिती कार्यक्षेत्रांमधली २९ मोठी क्षेत्रे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

या क्षेत्रात अत्यावश्यक सेवा ( किराणा दुकानं, मेडिकल स्टोअर्स, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आदी सेवा ) वगळून अन्य सर्व सेवा / व्यवसाय करण्यास आणि नागरिकांना ये – जा करण्यास,  एकत्र येण्यास मनाई आहे. आज १५ जुलै पासून पुढील १४ दिवस ही २९ क्षेत्रे प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.