rto camp

जव्हार येथे वाडा मार्गावर आमराई गार्डन येथे एका माळावर आरटीओ वाहनचालकांची पाहणी करून त्यांना वाहन चालविण्याचा परवाना व अन्य कामे करीत असतो. मागील अनेक वर्षांपासून हा कॅम्प सुरू असला तरी अद्यापही कायमस्वरूपी जागा आरटीओला उपलब्ध होऊ शकली नाही.

  जव्हार: सन २०१४ ला ठाणे(thane) जिल्ह्याचे विभाजन होऊन मोठ्या थाटात पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा अस्तित्वात आणण्यात आला. मात्र सरकारी बाबूंच्या सोयी सुविधा आदिवासी किंवा ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या दृष्टीने अधिक महत्वाच्या असल्यानेच पालघरला पसंती देण्यात आली असावी. याची अनेक उदाहरणे दिसत असताना प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई- विरार यांच्या माध्यमातून जव्हार येथे महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी आरटीओ कॅम्प चालविला जातो. उद्देश हाच की जव्हार, मोखाडा, वाडा आणि विक्रमगड येथील नागरिकांना जवळपास सुविधा उपलब्ध व्हावी शिवाय आपापल्या सोयीनुसार ऑनलाईन अर्ज करीत असताना वेळ घेता येतील. मात्र या शिबिरासाठी अधिकारी मनाला येईल त्या वेळेत येत असल्याने वाट पाहून लोकांचा मोठा खोळंबा होत आहे.

  जव्हार येथे वाडा मार्गावर आमराई गार्डन येथे एका माळावर आरटीओ वाहनचालकांची पाहणी करून त्यांना वाहन चालविण्याचा परवाना व अन्य कामे करीत असतो. मागील अनेक वर्षांपासून हा कॅम्प सुरू असला तरी अद्यापही कायमस्वरूपी जागा आरटीओला उपलब्ध होऊ शकली नाही.

  वाहनचालकाने वाहन चालविण्याचा परवाना मिळावा यासाठी नोंदणी केली असता त्याला आरटीओमार्फत भेटीची वेळ दिली जाते. ही वेळ साधारण सकाळी ११ च्या सुमारासची असते. वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागातून वाहनचालक यासाठी जीवाचा आटापिटा करून वेळेत उपस्थित राहतात. मात्र अधिकारी मनात येईल त्या वेळी उपस्थित राहिल्याने वाहनचालकांचा हिरमोड होतो.

  मला सकाळी अकराची वेळ दिली होती मात्र अधिकारी १.४० ला आल्याने उपाशीपोटी व उन्हात माझ्यासह जवळपास १०० जणांची अवस्था बिकट झाली.

  - मुकेश पाटील, वाहनचालक

  शिवाय आदिवासी ग्रामीण भागात लोक आपली आणि कुटुंबाची गुजराण कशी बशी करतात.त्यातच कॅम्पच्या दिवशी सुट्टी घेतली तर त्या दिवसाचा खाडा होऊन पेमेंट देखील मिळत नाही.शिवाय मनावर लायसन नसल्याचेही दडपण रहात असते.इंटरनेटची अडचण तर आरटीओ विभागाच्या पाचवीला पुजलेली.एवढ्या पराकाष्ठा करून कसे बसे पोहोचावे तर सरकारी बाबू आलेले नसतात.सकाळी लवकर घरातून निघावे लागते. परंतु १ वाजून जातो तरी सरकारी बाबुंचा पत्ता नसतो,.यावर काहीतरी उपाय योजना व्हाव्यात असे चारही तालुक्यातून बोलले जात आहे. याबाबत वसई- विरार ,पालघर जिल्हा प्रादेशिक परिवहन उपाधिक्षक दशरथ वागुळे यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

  ऑनलाईन यंत्रणेद्वारे नोंदणी करण्याची प्रादेशिक विभागाने केलेल्या व्यवस्थेने लूट थांबेल अशी अपेक्षा होती मात्र आजही आरटीओ भोवती दलालांची गर्दी असल्याने गरिबांची लूट सुरूच आहे. दुचाकीच्या लायसन्ससाठी मी २ हजार २०० रुपये अदा केले असून फेऱ्या मारून मेटाकुटीला आलो आहे.

  - भीमराव बागुल, अध्यक्ष ,गवंडी बांधकाम मजूर संघटना

  आरटीओ कार्यालयाच्या या शिबिराचा आत्तापर्यंत जव्हार मोखाडा विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील लाखो नागरिकांनी या लाभ घेतला आहे. येथील नागरिकांना वसईसारख्या शहराच्या ठिकाणी जाणे परवडत नसल्याने अतिशय योग्य नियोजन शिबिरादरम्यान होत असते. परंतु गेल्या काही आठवड्यापासून अधिकारी वर्ग उशिरा येत असल्याने नागरिकांचे काम होण्यास विलंब होत आहे.

  - किशोर जाधव, सामाजिक कार्यकर्ते, जव्हार

  प्रादेशिक परिवहन विभागाने खरेतर लोकांच्या सोयीसाठी ऑनलाईन नोंदणी करून दलालांकडून होणारी फसवणूक टाळण्याचा चांगला निर्णय घेतला असला तरी आजही आरटीओच्या बाजूला दलालांचाच वेढा असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लोकांची होणारी गैरसोय टाळता यावी म्हणून दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे अशी मागणी करण्यात येत आहे.