mansukh hiren

 ठाणे (thane)येथील अँटी करप्शनच्या कार्यालयात(anti Corruption Bureau) २४ तारखेला बिल्डर मयुरेश राऊत यांना जबाबासाठी बोलवण्यात आले आहे.

  वसई: अँटीलिया(Antilia) आणि मनसुख हिरेन प्रकरणात(Mansukh Hiren Case) जप्त केलेल्या ११ गाड्यांमध्ये आपल्या दोन गाड्यांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त करीत परमबीर सिंग,प्रदीप शर्मा आणि कोथमीरे यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या विरारमधील बिल्डरचा अँटी करप्शनकडून(anti Corruption Bureau) जबाब नोंदवण्यात येणार आहे.

  ठाणे येथील अँटी करप्शनच्या कार्यालयात २४ तारखेला बिल्डर मयुरेश राऊत यांना जबाबासाठी बोलवण्यात आले आहे. अँटिलिया बंगल्याजवळ सापडलेल्या कार आणि जिलेटिन प्रकरणाचा तपास सुरू असताना मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत सापडला होता. मृत्युपूर्वी त्यांचे शेवटचे लोकेशन वसईत असल्याचे सांगून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली होती.त्यानंतर एनआयएनचे पथक वसईत येवून गेले होते.देशभर गाजलेल्या या प्रकरणाचे पुन्हा एकदा वसई कनेक्शन असण्याचा संशय निर्माण झाला आहे.

  ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, खंडणीविरोधी पथकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी २०१७ मध्ये माझ्या दोन गाड्या जबरदस्तीने नेल्याचा आरोप करून एनआयएने जप्त केलेल्या ११ गाड्यांमध्ये या गाड्या असण्याची शक्यता विरारच्या एका बिल्डरने व्यक्त केली होती.

  ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग,खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी २०१७ मध्ये माझ्या दोन आलिशान गाडया बळजबरीने नेल्या तेव्हापासून त्या त्यांच्या ताब्यात आहेत.त्यावेळी या त्रयींनी माझे अपहरणही केले होते. तेव्हापासून त्यांच्या विरोधात बळजबरीने गाडी नेणे,अपहरण, जीवितास धोका अशी तक्रार मी वारंवार करत आहे. मात्र विरार पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत,असा आरोप विरारमधील इस्टेट एजंट तथा बांधकाम व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी करून खळबळ उडवून दिली होती.

  सध्या अँटीलिया प्रकरणात एनआयएने ११ गाड्या जप्त केल्या आहेत.त्यापैकी एक गाडी मनसुख हिरेन यांची होती त्यांचे प्रेत खाडीत मिळाले.माझ्या तर दोन गाड्या सिंग,शर्मा आणि कोथमिरे यांच्या ताब्यात आहेत.जप्त केलेल्या अकरा गाड्यांमध्ये माझ्या गाड्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.त्यामुळे याप्रकरणी चौकशी करून मला पोलीस संरक्षण देण्यात यावे.अशी तक्रार राऊत यांनी पोलीस आयुक्त सदानंद दाते, अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे केली होती. तसेच ,माझा मनसुख हिरेन होऊ देवू नका अशी विनवणी राऊत यांनी केली होती.

  या तक्रारीवरून अँटी करप्शन ब्युरो ठाणेचे उपअधीक्षक चंद्रमोहन यांनी राऊत यांना चौकशी जबाब नोंदवण्यासाठी सोमवारी बोलवले आहे. त्यामुळे २०१७ पासून सुरू असलेल्या या लढ्यात यश मिळण्याची आशा राऊत यांनी व्यक्त केली आहे.