महाविद्यालयाअभावी वसईतील गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

वसई: वसईच्या(vasai) पूर्व पट्टीतील कामण, पोमण, नागले, देवदळ, कोल्ही,चिंचोटी या गावात वीज,पाणी,रस्ते या समस्या भेडसावत होत्या.आता त्यात शैक्षणिक समस्येची(educational problem) भर पडली आहे. या परिसरात मराठी माध्यमाच्या तीन आणि इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळा आहेत. दहावी उत्तीर्ण झाल्यावर अकरावीला प्रवेश घेण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना बराच संघर्ष करावा लागतो. त्यातील अनेकांना प्रवेश मिळत नाही व त्यांचे शिक्षण थांबते. शेकडो विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी वसई किंवा अन्य दुरच्या ठिकाणी जावे लागते. हे ठिकाण घरापासून वीस-पंचवीस किलोमीटर दूर असल्यामुळे त्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी किमान दोन रिक्षा बदलून ट्रेनने प्रवास करावा लागतो.त्यासाठी बाराशे ते पंधराशे रुपये प्रवास भाडे खर्चावे लागतात.

येथील बहुसंख्य ग्रामस्थ आदिवासी, गरीब आणि कारखान्यामध्ये काम करणारे मजूर आहेत. आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्यांना परवडत नाही. खाजगी कॉलेजचा खर्च व प्रवास खर्च परवडत नसल्याने ते आपल्या मुलांना पुढील शिक्षणासाठी पाठवत नाहीत. विद्यार्थी कुठेतरी रोजंदारीवर कारखान्यात कामावर जातात अथवा चुकीच्या मार्गाने जातात. मुलींची अवस्था त्याहूनही बिकट आहे शिकण्याची इच्छा असूनही परवडत नसल्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून लग्नाचा मार्ग पत्करावा लागतो.

यंदा कामण येथील जिल्हा परिषद शाळा येथे प्रथमच दहावीचा वर्ग सुरू होऊन या वर्षीचा निकाल ९५ टक्के लागला आहे. त्यावरून परिस्थिती नसतानाही येथील विद्यार्थ्यांची शिक्षणाची ओढ दिसून येत आहे.

या परिसरातील ग्रामस्थांची कामण येथे ज्युनियर कॉलेज व्हावे, अशी बर्‍याच वर्षांपासूनची मागणी आहे.शासनाने या परिस्थितीचा व ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून महाविद्यालय अथवा कनिष्ठ महाविद्यालय सुरू करावे.

अ‍ॅड.दिनेश म्हात्रे