vasai virar potholes

वसई : रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे बुजवण्यात वसई विरार महानगर पालिकेतील प्रशासन फेल गेले आहे. ऐन सणांमध्ये खड्ड्यात आपटत मार्गक्रमण करावे लागत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

वसई : रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे बुजवण्यात वसई विरार महानगरपालिकेतील(vasai virar potholes issue) प्रशासन फेल गेले आहे. ऐन सणांमध्ये खड्ड्यात आपटत मार्गक्रमण करावे लागत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

महापालिका हद्दीतील नालासोपारा संतोष भवन,बिलालपाड,आचोळे,नगीनदासपाडा,विरारमधील कारगीलनगर,नारंगी, बोळींज,वसईतील एव्हरशाीन,वसंतनगरी अशा मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.पावसाळ्यानंतर हे खड्डे पुर्णतः बुजवण्यात येतात. तत्पुर्वी गणेशोत्सवात मिरवणूक आणि विसर्जनासाठी या खड्ड्यांची डागडुजी करण्यात येते. यंदा मात्र,गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवातही हे खड्डे पाहायला मिळाले आहेत. महापालिकेच्या स्थापनेनंतर अल्पावधीतच लोकप्रतिनिधींचा कारभार सुरु झाला. त्यामुळे लोकांची गैरसोय होवू नये आणि अपघात टाळण्यासाठी तत्परता दाखवून लोकप्रतिनिधींना रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास प्राधान्य दिले. यंदा मात्र लोकप्रतिनिधींचा कारभार संपुष्टात येवून प्रशासकीय राजवट आल्यामुळे खड्डेमय रस्ते सर्वत्र दिसून येत आहेत.

हे खड्डे बुजवण्यासाठी अनेक नागरिकांनी आपापल्या प्रभाग समिती आणि माजी नगरसेवकांकडे तक्रारी केल्या. मात्र, शासकीय अधिकार्‍यांनी टाळाटाळ केली. तसेच माजी नगरसेवकांनी हात वर केले. वारंवार तक्रारी येत असल्यामुळे अनेक अधिकार्‍यांनी तर पत्रकारांचेही फोन ब्लॉक केले. माजी महापौर तथा बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते नारायण मानकर,प्रवीण शेट्टी यांनीही आयुक्तांची भेट घेवून खड्डे बुजवण्याची मागणी केली. मात्र,त्यांनाही करतो असेच उत्तर देण्यात आले. या प्रकरणी आयुक्त गंगाथरण डी.यांच्याशी संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे त्यांनी मोबाईलवर बोलण्याची तसदी घेतली नाही.

  •  सर्वत्र खड्डे पडले आहेत. त्यासाठी आयुक्तांची भेटही घेतली. मात्र,करतो असेच उत्तर त्यांनी दिले. ठेकेदारांची बिले रखडली आहेत. त्यामुळे ते काम करण्यास तयार नाहीत .लोकप्रतिनिधींच्या काळात आम्ही ठेकेदारांना विश्‍वासात घेवून काम करून घेत होतो. बिले रखडल्यामुळे ठेकेदारांना प्रशासनावर विश्साव राहिलेला नाही. त्यामुळे खड्डे बुजवण्यात पालिकेला अपयश आले आहे.- प्रवीण शेट्टी,माजी महापौर,वसई-विरार महापालिका
  •  खड्डे कधी बुजवण्यात येतील,याचा सर्व इंजिनीअर्सकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.- गणेश पाटील,जनसंपर्क अधिकारी,वसई-विरार महापालिका