सरकारी यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित – प्रविण दरेकर

सरकार फक्त घोषणा करून मोकळी झाली असून नुकसाग्रस्तांचे सरकारला काही देणेघेणे नाही, अशी टीका विधान पारिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी केली आहे.

  पालघर: चक्रीवादळग्रस्तांना(Cyclone Affected) सरकारने मदत जाहीर केली ती तुटपुंजी आहे. पंचनामे व्यवस्थित झालेले नाहीत, हे सरकारच्या लक्षात आणून दिले होते. पण आज नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालघर जिल्ह्यात आल्यानंतर त्याची प्रचिती येत आहे. सरकारच्या यंत्रणांमध्ये कोणतेही समन्वय नसल्याने सरकारी मदतीपासून अनेक नुकसानग्रस्त वंचित राहतील. सरकार फक्त घोषणा करून मोकळी झाली असून नुकसाग्रस्तांचे सरकारला काही देणेघेणे नाही, अशी टीका विधान पारिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी केली आहे.

  आज दरेकर पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर(Palghar Visit) आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार मनीषा चौधरी उपस्थित होत्या.

  पाहणी केल्यानंतर दरेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, सरकारने मदत जाहीर केली पण ती मदत तुटपुंजी आहे. जी माहिती आम्हाला मिळाली त्यानुसार पालघर जिल्ह्याचा नुकसानीचा अहवाल महसूल यंत्रणेने पाठवला त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे वस्तुस्थिती आणि पंचनामे यात मोठी विसंगती आहे. तहसीलदार कार्यालयाने पंचनामे केले पण एमएसईबीला त्याची माहिती नाही. वीज मंडळाचे अधिकारी सांगतात किती रक्कम द्यायची माहीत नाही. सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याची आवश्यकता होती. पण सरकारचे याकडे लक्ष नाही. ऊर्जा मंत्र्यांशी संवाद साधला असून तातडीने आदेश देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. आजच्या दौऱ्यामुळे काही बदल घडेल, अशी अपेक्षाही दरेकर यांनी व्यक्त केली.

  भाजपाच्या प्रयत्नाबाबत बोलताना दरेकर म्हणाले, भाजपच्या वतीने आमदार मनीषा ताई चौधरी यांच्या पुढाकाराने नुकसानग्रस्त लोकाना आर्थिक मदत करण्यात आली आहे. या संकट काळात भाजपने पालघर येथील लोकांना १-२ महिन्यासाठी जीवनाश्यक वस्तु दिल्या आहेत. अशा पद्धतीने दिलासा, पाठबळ देण्याचे काम भाजपा करीत आहे. याशिवाय सरकारवर आणखी दबाव आणून तात्काळ मदत करण्यास भाग पाडू, असा दावाही त्यांनी केला.

  तौक्ते चक्रीवादळाच्या संकटामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन बोलण्याची सवय करा. दिवसभर सरकार पाडणं, ठेवणं या पलीकडे जाऊन चक्रीवादळग्रस्तांना पुन्हा कसं उभं करता येईल, याची चिंता करण्याची गरज आहे. ठाकरे सरकारला लोकांची घर पडलेली दिसत नाहीत परंतु सरकार पडण्याची भीती त्यांना सतावते आहे. आम्ही कोणाचे घर, सरकार पाडायला जात नाही. त्यामुळे सरकारने आता जनतेवर लक्ष केंद्रीत करावे, लोकांना साथ द्यावी, अशी अपेक्षाही दरेकरांनी व्यक्त केली.

  पालघर पालकमंत्र्यांच्या विविध घोषणांबाबत दरेकर म्हणाले,पालकमंत्री केवळ घोषणा करत आहेत. पण घोषणांची अमलबजावणी होताना दिसत नाही, यासाठीच आम्ही दौरे करत असून जेणेकरून सरकारला केवळ घोषणाच नाही तर त्याची अंमलबजावणी करण्यास आम्ही भाग पाडू.