आगीने नुकसान झालेल्या ब्राम्हणपाड्याला प्रविण दरेकरांची भेट; व्यवसाय पुन्हा उभा करून देण्याचे दिले आश्वासन  

मौळे याना धीर देताना पुन्हा व्यवसाय उभा करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे ५ लाख रुपयांची मदत करू, सरकारकडून सानुग्रह अनुदान आणि नुकसान भरपाइ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासनही दरेकर यांनी दिले आहे.

    पालघर : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज कुटूंबातील चार व्यक्ती, घर आणि दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या अनंता बाळू मौळे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच मानवी दृष्टिकोनातून व्यवसाय पुन्हा उभा करून देण्यासाठी भाजपातर्फे पाच लाख रुपये मदत देऊ, असा विश्वास मौळे याना दिला, अशी माहिती भेटीनंतर विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनीच माध्यमांना दिली. एकाच कुटुंबातील चार जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

    दरम्यान या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन प्रविण दरेकर यांनी आज ब्राम्हणपाडा येथे जाऊन अनंता बाळू मौळे यांची सांत्वनपर भेट घेऊन घटनास्थळाची पहाणी केली. दरेकर म्हणाले की, अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, मौळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या आगीत ३ दुकाने पूर्णपणे जाळून खाक झाली असून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आपद्ग्रस्त हे आदिवासी समाजाचे असून, भेटीच्या वेळी उपस्थित असलेले आदिवासी विकास विभागाचे अधिकारी व तहसीलदार यांनी अशी माहिती दिली की, नियमानुसार नुकसान भरपाई बाबत शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे, या प्रस्तावाची देखील दरेकर यांनी माहिती घेतली.

    प्रविण दरेकर यांनी मदतीचे दिले आश्वासन

    २८ मार्चला ही अचानक आग लागली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील  ब्राम्हणपाडा स्टॉप येथील अनंता बाळू मौळे यांचे घर व होलसेल किराणा मालाचे दुकान होते, त्यात २८ मार्चला रात्री २.३० च्या दरम्यान अचानक शॉट सर्किटमुळे आग लागली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. घरात अनंताची चार मुले, आई व पत्नी असे सात जणांचे कुटुंब राहत होते. आगीत झोपलेल्या वृद्ध आई गंगुबाई मौळे, पत्नी द्वारका मौळे, मुलगी पल्लवी मौळे वय १५, तर मुलगा कृष्णा मौळे वय १० वर्ष या चौघांचा झोपेतच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मुलगा भावेश मौळे वय १२ व मुलगी अश्विनी मौळे वय १७ वर्ष हे दोघे भाजले असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले, असून अनंता मौळे यांना डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांना मोखाडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मौळे याना धीर देताना पुन्हा व्यवसाय उभा करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे ५ लाख रुपयांची मदत करू, सरकारकडून सानुग्रह अनुदान आणि नुकसान भरपाइ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासनही दरेकर यांनी दिले आहे.