rice crops loss poladpur

आधीच वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पालघर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसेच ऑक्टोबरमध्येही परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशातच शुक्रवारी अवकाळी पाऊस कोसळला.

पालघर नवराष्ट्र टीम : आधीच वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पालघर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसेच ऑक्टोबरमध्येही परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदाचा हंगाम हा नुकसानीला आमंत्रण देणारा ठरला आहे. शुक्रवारीही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओसळले आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते, त्यामुळे रब्बी हंगाम अडचणीत असल्याचे चित्र होते, त्यात वसई, वाडा आणि पालघर तालुक्यांत अवकाळी सरी बरसल्यामुळे शेतीसह विटभट्टी व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे.

wet grain

शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून वसई तालुक्यात अवकाळी पावसाने सुरूवात केली. दुपारपर्यंत मंद गतीने तो पडत होता. त्यामुळे आभाळात मळभ निर्माण होवून हवेत आद्रता आली होती. अवकाळी पडलेल्या या पावसाने मात्र, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेला आहे. पावसाळ्यात भातशेती वाहून गेल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले होते. गेल्या वर्षीही हीच परिस्थिती होती. त्यावेळी पंचनामे करून भरपाई देण्याची कबुल करण्यात आले होते. २०१९ ची भरपाई मिळाली नसतानाच २०२० ला पुन्हा मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान केले. त्याचेही पंचनामे झाले मात्र, भरपाई मिळाली नाही. तरीही शेतकरी पुन्हा नव्या जोमाने शेतात उतरले.

भातपिकानंतर मेथी, चवळी, लालमाठ, मुळा, वांगी, कोबी, गवार अशा भाज्या त्यांनी पेरल्या. त्याचे पिक चांगले आल्यामुळे चांगली आवक होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, या आशेवर अवकाळी पावसाने पाणी फेरले आहे. अवकाळी पावसाचे पाणी खारट असल्यामुळे पाले भाज्या करपून गेल्या. आंब्याला आलेला हिरवा मोहोर काळपटून गेला. त्यामुळे तयार झालेल्या भाज्या शेतातच झोपल्या आहेत. तर आंब्याचे फळही गळून जाणार असल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्यास चिंतेत भर पडली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. यंदाही फक्त पंचनाम्यावरच शासन थांबले आहे. त्यात अवकाळी पावसाचे संकट आले. या पावसाने आमच्या भाज्या शेतातत करपवल्या. आंब्याचा हिरवा मोहोरही जळून गेला आहे.

- दत्ता पाटील, शेतकरी, वाघोली

गेल्या वर्षी कोरोनामुळे लवकर बंद झालेला वीट व्यवसाय नुकताच सुरू झाला आहे. मात्र अवकाळी पावसाने कच्च्या विटा विरघळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असणारा वीट उत्पादक अवकाळी पाऊस लांबल्यास अधिक अडचणीत येईल.

- नरेश पाटील, वीट उत्पादक शेतकरी,चंद्रपाडा - वाडा

मच्छिमार बांधवांसह गवत व्यापाऱ्यांचे नुकसान
तालुक्यात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी, मच्छिमार, वीटभट्टी, गवत व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कोरोनामुळे आधीच जीव मेटाकुटीला आला असताना अचानक उद्भवलेल्या अस्मानी संकटामुळे सर्वजण हतबल झाले आहेत. पालघर तालुक्यात दोन ते अडीच तास रिमझिम पाऊस झाला. या पावसाचा मच्छिमार बांधवांना फटका बसला आहे. दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात बोंबील, करंदी, कोलंबी (सोडे) सुकवून विकत असतात. या सुक्या मच्छिला भाव सुद्धा चांगला असतो. अचानक आलेल्या पावसामुळे सुक्या मच्छिचा व्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांना त्याचा मोठा फटका बसला आहे.

पालघर, डहाणू, विक्रमगड या भागात गवताचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असतो. भातपिक झाल्यानंतर त्याच्या उरलेल्या ‘भातव्याना’ची गंज विक्रीसाठी रचून ठेवली होती. परंतु, ही गंज पावसामुळे भिजल्यामुळे त्याचा खरेदीदरम्यान व्यावसायिकांना फटका बसणार आहे. गंज भिजल्यामुळे त्याला नेहमीपेक्षा कमी भाव मिळण्याची शक्यता आहे.

bricks

कच्च्या विटा विरघळून जाण्याची शक्यता
पालघर, विक्रमगड व वाडा तालुक्यात वीटभट्टी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. येथे ठिकठिकाणी वीट तयार करण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे, तर काही ठिकाणी विटा तयार होऊन त्या सुकवण्यासाठी ठेवल्याही आहेत. परंतु, पावसामुळे आता या विटा भिजल्यामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. वीट उत्पादक पावसामुळे धस्तावले असून पुढेही पाऊस झाला तर कच्च्या विटा विरघळून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.