rain

  • मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक सखल भागातले रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर पालघर , बोईसर, धनानीनगर सह अनेक ठिकाणी रात्री लोकांच्या घरामध्ये आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे लोकं रात्रभर आपल्या घरांमधलं, रुमांमधलं पाणी काढत असतानाचं चित्र दिसून आलं.

पालघर : पालघर जिल्ह्यात मंगळवार रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यात पावसानं सोमवारपासून चांगली हजेरी लावली आहे. मात्र मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसानं हजेरी लावली. मंगळवारी रात्री दोन ते अडीच वाजताच्या दरम्यानपासून सर्वत्र विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह सकाळपर्यंत मुसळधार पाऊस बरसला. 

हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार रातभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक सखल भागातले रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर  पालघर , बोईसर, धनानीनगर सह अनेक ठिकाणी रात्री लोकांच्या घरामध्ये आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे लोकं रात्रभर आपल्या घरांमधलं, रुमांमधलं पाणी काढत असतानाचं चित्र दिसून आलं. रात्रभर बसलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर मधल्या अनेक भागातल्या मोठमोठ्या गाड्या पाण्याखाली बुडलेल्या दिसून आलेल्या.तर काही रिक्षा, कार ह्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याचं ही वृत्त आहे. मात्र सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर ह्या गाड्या पुन्हा खेचून बाहेर आणण्यात आल्या.   

मुसळधार पावसामुळे पालघर कोर्टाच्या आत पाणी शिरलं आणि कोर्ट परिसरात ही सर्वत्र पाणीच पाणी साचलेलं दिसून आलं. बऱ्याच ठिकाणचा वीजपुरवठा कालपासून खंडित झाल्यानं अनेक भाग कालपासून अंधारात आहेत. तर पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या चिखले गावात एका घरावर झाडं उनमळून पडल्यानं घराचे पत्रे, कौलं तुटून घराचं आणि घरातल्या सामानाचं मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचं ही वृत्त आहे.   

पालघर जिल्ह्यात आज सरासरी २६५.४४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून वसई तालुक्यात – १९६ मिमी, जव्हार तालुक्यात – १६२.० मिमी, विक्रमगड तालुक्यात – १८७.० मिमी, मोखाडा तालुक्यात – ८७.५५ मिमी, वाडा तालुक्यात – २२२.० मिमी, डहाणू तालुक्यात – ४६५.२८ मिमी, पालघर तालुक्यात – ३७९.९३ मिमी तर तलासरी तालुक्यात – ४२३.८ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.