रिद्धिविनायक हॉस्पिटलने उभारला स्वत:चा ऑक्सिजन प्लांट

नालासोपारा: कोरोना रूग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेला खाजगी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत असताना नालासोपाऱ्यातील रिद्धीविनायक हॉस्पिटलने स्वतःचा ऑक्सिजन प्लांट(oxygen plant) तयार करून शेकडो रुग्णांना जीवदान दिले आहे.

वसई(vasai) तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज दोनशेच्या सरासरीने वाढत चालली आहे. त्यातच रुग्ण दगावण्याचे प्रमाण काहीसे वाढलेले दिसत आहे. कोरोनाची लस तयार झालेली नसली तरी दाखल झालेल्या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी वसई विरार महापालिकेने ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधला आहे.या कंपनीमार्फत महापालिकेच्या कोवीड सेंटर्सना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.त्यासाठी एक विशेष पथकही तैनात करण्यात आले आहे.

महापालिकेला ऑक्सिजनसाठी खासगी कंपन्यांवर अवलंबून रहावे लागत असताना नालासोपारा पश्चिमेकडील रिद्धीविनायक रुग्णालयाने स्वतःचे ऑक्सिजन प्लांट (ऑक्सिजन जनरेटर प्लांट) उभारला आहे. दररोज सुमारे ११० ते ११५ सिलेंडर ची निर्मिती या प्लांटमध्ये होत असते. गेले ३ महिने हा प्लांट सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील हे पहिले हॉस्पिटल आहे जे स्वतःच्या प्लांटमधील ऑक्सीजन चा वापर करते.

अवाढव्य अशा या रीद्धिविनायक हॉस्पिटलच्या कोणत्याही कक्षात ऑक्सिजन पोहोचू शकेल अशी व्यवस्था या प्लांट द्वारे करण्यात आली आहे. संपुर्ण रुग्णालयात पाईपलाईनद्वारे हा पुरवठा सुरू आहे. कोरोना रुग्णांना अत्यावश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा त्वरीत मिळत असल्यामुळे रिद्धी विनायकने गेल्या तीन महिन्यात शेकडो लोकांना जीवनदान दिले आहे.

रिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये खाजगी आणि महापालिकेची अशी दोन सेंटर्स होती. या सेंटरमध्ये क्रिटिकल रुग्ण सतत दाखल होत होते. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा कधीही भासू शकतो. पावसाळ्यात इतर कंपन्यांतून हा पुरवठा तात्काळ मिळणे शक्य नव्हते त्यामुळे आपल्याच हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन प्लांट तयार करण्याची योजना डॉक्टर गोयल यांनी अमलात आणली .