lockdown

कोरोनाला अटकाव घालण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांनी पुन्हा १५ दिवसांची(lockdown extended till 15th may) टाळेबंदी वाढविल्याने सलून व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

  संदीप साळवे, जव्हार: जव्हार तालुक्यातील २२०० सलून व्यावसायिक(saloon businessman facing problem) केश कर्तन आणि दाढी करून आपापल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजविला असल्याने राज्य शासनाने एप्रिल महिन्यापासून पुन्हा टाळेबंदी जाहीर केली.

  सुरुवातीला ही टाळेबंदी एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत होती परंतु कोरोनाला अटकाव घालण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांनी पुन्हा १५ दिवसांची टाळेबंदी वाढविल्याने सलून व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

  सलून व्यावसायिकांचा रोजगार बुडाल्याने आपापली कुटुंबे पोसायची कशी या चिंतेत ते आहेत. शासन स्तरावर काहीतरी मदत मिळावी म्हणून आशा लावून बसले आहेत.सध्या तालुक्यातील कोरोना परिस्थिती अतिशय भयानक आहे. यावर प्रशासनाकडून टाळेबंदी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या भल्यासाठी प्रशासन,आरोग्य यंत्रणा ,पोलीस यंत्रणा,काही सामाजिक संस्था तसेच सेवाभावी तरुण वर्ग अहोरात्र काम करीत आहे. जेणे करून तालुक्यातील कोरोना वाढीला ब्रेक लावून तालुक्यात पुन्हा सुख शांतता आणि आरोग्य नांदेल यासाठी सर्वच स्तराहून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

  गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये सामाजिक संस्थांनी धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले असल्याने मदत झाली होती. मात्र यंदाची परिस्थिती अतिशय भयानक असून कुटुंब सांभाळायचे कसे असा प्रश्न पडत आहे. घरातील कुणी या आजाराने त्रस्त झाल्यास याचा उपचार देखील महाग असल्याने शासन स्तरावर मदत व्हावी अशी आम्ही सर्व सलून व्यावसायिक वाट पाहत आहोत.

  - नितीन अहिरे,सलून व्यावसायिक,जव्हार

  सलून व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना अद्याप शासकीय मदतीबाबतची माहिती आमच्या कार्यलयाला प्राप्त झाली नाही. मात्र अशी कुटुंब अधिक असल्यास धान्य पुरवठा करण्याचे प्रयत्न करण्यात येतील.

  - संतोष शिंदे,तहसीलदार, जव्हार

  जव्हार तालुक्यातील शासकीय यंत्रणांना कोरोनाने ग्रासले आहे. तालुक्यातील सर्वच आरोग्य विभागाकडून अशा ठिकाणी यावर उपचाराचे उत्तम नियोजन सुरू आहे.जीव वाचविणे हा उद्देश प्राथमिक असल्याचे या सगळ्या चित्रातून निदर्शनास येत आहे.मात्र बराच मजूर वर्ग हा कोरोनापासून बचाव होण्यासाठी मजुरी नसल्याने घरी बसला आहे.यात काही अंशी शेत मजुरी किंवा बांधकामे चालू देखील आहेत.तालुक्यात जवळपास सगळेच व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू असताना केवळ सलून व्यावसायिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा चांगलाच तडाखा बसत चालला आहे.