दुकानदाराचे प्रसंगावधान आणि दरोडेखोरांचे गळाले अवसान

वसई: कचऱ्याच्या डब्याने सशस्त्र दरोडेखोरांना(robbers) पळवून लावल्याची घटना नालासोपारातील(nalasopara) आचोळे परिसरात घडली आहे. आचोळे रोडवरील गगन विहार कॉम्प्लेक्समध्ये आदिनाथ ज्वेलर्सचे दुकान आहे.

दुकान बंद करून या आदिनाथ ज्वेलर्स(adinath jewelers) दुकानाचे मालक चेतन जैन मंगळवारी रात्री नऊ वाजता निघण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी हेल्मेट घातलेल्या हातात प्लास्टिकचे पिस्टल व चाकू घेतलेल्या एका इसमाने दुकानात प्रवेश केला. त्यानेे जैैन आणि त्यांच्या सहकाऱ्याला बंदी बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र जैन यांनी प्रसंगावधान राखून दुकानातला कचऱ्याचा डबा बाहेर फेकला. त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे दुकानदार सावध झाले. त्यांनी आदिनाथ ज्वेलर्सकडे आपले लक्ष केंद्रित केले. ही संधी साधून जैन आणि त्यांच्या सहकाऱ्याने आरडाओरडा केला.त्यामुळे त्या दरोडेखोराला पळ काढावा लागला.रस्त्यावर धावत असताना तो एका दुचाकीला धडकला. काही लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता शस्त्राचा धाक दाखवून तो पळून गेला.या घटनेची पोलिसांनी नोंद केली असून सीसीटीव्ही फुटेज आधारावर या दरोडेखोराचा तपास करण्यात येत आहे.

आदिनाथ ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला जात आहे. – डी.एस. पाटिल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक