मुजोर वन अधिकाऱ्यांच्या विरोधात श्रमजीवी संघटनेचं ठिय्या आंदोलन

  • श्रमजीवी संघटनेनं दहिसरच्या वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. यावेळी मोठ्या संख्येनं जमलेल्या आंदोलकांनी वन अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर श्रमजीवी शिष्टमंडळ आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यां मध्ये झालेल्या चर्चेनंतर वनविभागानं काही मागण्या मान्य करून त्याबाबतचं लेखी आश्वासन दिलं. आश्वासनानंतर श्रमजीवी संघटनेकडून आंदोलन मागे घेण्यात आलं.

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या दहिसर वन परीक्षेत्रातल्या प्रलंबित वन दाव्याबाबत तसचं हायवेलगत असलेल्या हॉटेल्सच्या अनधिकृत बांधकामावर कोणतीही कारवाई न करता केवळ वनपट्टे धारक आदिवासींवर सूडबुद्धीनं खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या भातशेतीचं नुकसान करणाऱ्या वन अधिकाऱ्यांच्या विरोधात गुरुवारी दहिसर वन परीक्षेत्र कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे सुरुवातीला अरेरावीची भाषा करणाऱ्या वन अधिकाऱ्यांनी नमते घेत शेवटी श्रमजीवीच्या शिष्टमंडळाला लेखी आश्वासन दिल्यानंतर रात्री आठ वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आलं.   

श्रमजीवी संघटनेनं दहिसरच्या वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. यावेळी मोठ्या संख्येनं जमलेल्या आंदोलकांनी वन अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर श्रमजीवी शिष्टमंडळ आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यां मध्ये झालेल्या चर्चेनंतर  वनविभागानं काही मागण्या मान्य करून त्याबाबतचं लेखी आश्वासन दिलं. आश्वासनानंतर श्रमजीवी संघटनेकडून आंदोलन मागे घेण्यात आलं     

विविध मागण्या :

१) वनपट्टे धारक आदिवासींवर ७ जूलै ला दाखल झालेल्या गुन्हयाबाबत १५ ऑगस्ट पर्यंत चौकशी पूर्ण करून दोषीवर, वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करण्या बाबत आश्वासन दिलं.

२) सातिवली येथील सर्व्हे न. ३६ मध्ये गैरआदिवासी यांचं अतिक्रमण ३१ जूलै ला वनपरीक्षेत्र अधिकारी दहिसर यांनी हटविण्याबाबत आश्वासन दिलं.

३) दहिसर वन परिक्षेत्रातल्या हालोली, सातिवली, खैरा, ढेकाळे, कुडे, नावझे या गावातले एकूण १५४ दावे हे वनपरीक्षेत्र अधिकारी दहिसर यांनी ३ आठवड्यात सहा वनसंरक्षक पालघर यांच्या कार्यालयात सादर करण्या बाबत आश्वासन दिलं.

४) ६ ऑगस्ट ला हालोली इथं मजुरीबाबत सभा घेण्याबाबत आश्वासन दिलं.

५) वनरक्षक सावरे एम्बुर यांनी बाल मजुरांना कामावर लावल्याच्या तक्रारीबाबत वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल सादर करावा. 

अशा प्रकारच्या काही मागण्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य करून श्रमजीवीच्या  शिष्टमंडळा सोबत चर्चा करून त्याबाबतचं लेखी आश्वासन दिलं. आश्वासनानंतर श्रमजीवी संघटनेकडून आंदोलन मागे घेण्यात आलं. या आंदोलनात श्रमजीवी संघटना महाराष्ट्र अध्यक्ष रामभाऊ वारणा, जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ रेंजड, तालुका अध्यक्ष दिनेश पवार,तालुका उपाध्यक्ष मनोज कवळी,अरविंद रावते,विजयाताई सांबरे,सचिव सुरेश बरडे,सहचिव वैशाली बारगा,रेखाताई धांगडे,महिला प्रमुख सुनिता साबंरे,अमृत वड,नामदेव कांबडी आणि तालुका पदाधिकारी, सक्रिय कार्यकर्ते, झोन प्रमुख,गाव कमेटी प्रमुख, सभासद मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.