टँकर माफिया द्वारे कारखान्यात पाण्याची चोरटी वाहतूक उघड; अशाप्रकारे वाहतूक करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

तारापूर औद्योगिक वसाहती मधील कारखानदार एमआयडीसी कडून मिळणाऱ्या मर्यादित पाण्याचा वापर झाल्यानंतर इतर मार्गाने आणलेले पाणी उत्पादन प्रक्रियेत वापरत आसल्याचे समोर आल्याने सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात क्षमतेपेक्षा अधिक सांडपाणी येऊन तारापूर औद्योगिक वसाहती मधील प्रदूषणाचा स्तर उंचावत आहे.

  बोईसर : प्रदूषण रोखण्यासाठी तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये टँकरद्वारे पाण्याच्या वाहतुकीवर असलेल्या बंदीचे आदेश धाब्यावर बसवून चोरट्या पद्धतीने पाण्याची वाहतूक करून कारखान्यांमध्ये वापरले जात आसल्याचा प्रकार एमआयडीसीच्या फिरत्या पथकाकडून समोर आला आहे.

  विकास इंडस्ट्रीज या कारखान्यात उत्पादन प्रक्रियेत वापरण्यासाठी बेकायदेशीर रित्या टँकर माफिया कडून आणलेले पाण्याचे ड्रम जप्त करण्यात आले असून याप्रकरणी कारखान्यावर बोईसर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  तारापूर औद्योगिक वसाहती मधील कारखानदार एमआयडीसी कडून मिळणाऱ्या मर्यादित पाण्याचा वापर झाल्यानंतर इतर मार्गाने आणलेले पाणी उत्पादन प्रक्रियेत वापरत आसल्याचे समोर आल्याने सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात क्षमतेपेक्षा अधिक सांडपाणी येऊन तारापूर औद्योगिक वसाहती मधील प्रदूषणाचा स्तर उंचावत आहे.

  पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात औद्योगिक वसाहती मध्ये पाण्याच्या टँकरवर बंदी घातली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तारापूर औद्योगिक वसाहती मध्ये रात्रीच्या वेळी टँकरद्वारे पाणी वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती.

  गुरुवारी रात्री एमआयडीसी च्या फिरते पथक तारापूर औद्योगिक वसाहती मध्ये गस्त घालत होते. यावेळी प्लॉट क्रमांक L 39 मधील विकास इंडस्ट्रीज एन्ड केमीकल्स प्रा.लि. या कारखान्याची पाहणी केली असता कारखान्यात वेस्टेज माल ठेवण्याचे शेडच्या मोकळ्या जागेवर एका टेम्पोची (MH04DD0341) तपासणी करण्यात आली. टेम्पोत २00 लिटत क्षमतेचे पाण्याने भरलेले तेरा आणि टेम्पोतून खाली उतरविण्यात आलेले तेरा ड्रम मिळून २६ ड्रम आढळून आले.

  ड्रम मधील पाण्याबाबत विचारणा केली असता पाणी तारापूर औद्योगिक वसाहतीच्या बाहेरून आणल्याची माहिती कारखान्याच्या मालकाने दिली. याबाबत एमआयडीसीच्या अभियंत्यांनी तातडीने बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून पाण्याचे ड्रम आणि टेम्पो ताब्यात घेतला.

  एमआयडीसीच्या अभियंत्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार विकास इंडस्ट्रीज अँड केमिकल्स प्रा.लि. या कारखान्याचे मालक आणि टेम्पो चालकावर बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता मुकेश लांजेवार, वाहन चालक विजय सोनवणे आणि मदतनीस मिथुन शिंदे यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.

  बोईसर औद्योगिक वसाहती मध्ये एमआयडीसीने दिलेल्या पाणीपुरवठ्याचा वापर करावा अवैधरित्या बाहेरून टँकरद्वारे पाण्याच्या वापर प्रदूषणाला घातक आहे जर कोणी अशा सूचना देऊनही पाण्याच्या टँकर चा वापर कारखान्यांनी केल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

  राजेंद्र अनासने, उप अभियंता एमआयडीसी देखभाल दुरुस्ती विभाग

  बोईसर मध्ये गेल्या काही महिन्यापासून टँकर माफियांचा सुळसुळट सुरू असून एमआयडीसी कार्यालया कडून झालेली कारवाई ही उत्तम असून येथून पुढे ही अशाच पद्धतीने कारवाई करण्यात यावी जेणेकरून टँकर माफियांना आळा बसेल.

  रूपेश मोरे, ग्रामस्थ