मास्क न वापरणार्‍यांवर पालघर पालिकेकडून कडक कारवाई

कोरोनाची संभाव्य लाट रोखणयासाठी वसई-विरार महापालिकेने मास्क न लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात केली आहे. या कारवाईमुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडत असली तरी कर्मचार्‍यांना मात्र,लोकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.

    वसई (Vasai). कोरोनाची संभाव्य लाट रोखणयासाठी वसई-विरार महापालिकेने मास्क न लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात केली आहे. या कारवाईमुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडत असली तरी कर्मचार्‍यांना मात्र,लोकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.

    लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर सोशल डिस्टन्स न ठेवता आणि सॅनिटायझरचा वापर न करता हजारो लोक भर वस्तीत फिरत आहेत.मास्क लावण्याचा साधा नियमही त्यांच्याकडून पाळला जात नाही.त्यामुळे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा धोका संभवला आहे.मुंबई आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचे नवीन रुग्ण वाढत चालले आहेत.या मुंबईत उद्योग धंदा,नोकरी आणि व्यापारानिमीत्त लाखो वसईकर दररोज जात आहेत.त्यांच्याकडून पुन्हा एकदा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होण्याचा धोका वाढला आहे.गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्णांची संख्या वाढत चालली असून,बरे होणार्‍यांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.

    मास्क न वापरणार्‍या नागरिकांवर त्यांनी पोलीसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात केली आहे.विरार,नालासोपारा आणि वसई शहरातील मुख्य रस्त्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे.या कारवाईतून समेळपाडा, आचोळे, तुळींज, विरार पूर्व आणि वसईतील अंबाडीरोड परिसरातून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडत असली तरी वसुली करताना कर्मचार्‍यांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच नागरिकांकडून त्यांना टिकेचे लक्ष केले जात आहे.मास्क न लावणार्‍या नागरिकांना हटकल्यावर त्यांच्याकडून कायदा दाखवा अशी हुज्जत घातली जाते.दंड न भरण्यासाठी ओळखी सांगतिल्या जातात.तर काही लोक चक्क पळून जात आहेत.वसई तालुक्यातील सुमारे ९०० रुग्ण कोरोनामुळे मयत झाली आहेत.तरिही नागरिकांनी त्याची तमा बाळगली नाही.त्यामुळे किमान मास्क लावण्याची सवय लावण्यासाठी त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.ही कारवाई सतत सुरु राहणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

    मास्क न घातल्याबद्दल दंडात्मक रक्कम भरण्यासाठी हुज्जत घातली जाते.तर कधी मोठ्या ओळखी सांगितल्या जातात.कोरोनाकडे मात्र ही ओळख चालत नाही याचा विचार नागरिकांकडून केला जात नाही.ही दुर्देवी बाब आहे. - अभय चौकेकर, अतिक्रमण प्रमुख महापालिका