Unauthorized construction in Chinchoti is harmful to the environment Neglect of Vasai Virar City municipal Corporation
निसर्गरम्य चिंचोटीतील अनधिकृत बांधकामे पर्यावरणाला घातक; वसई विरार शहर महानगर पालिकेचे दुर्लक्ष

पर्यावरणाला घातक अशी अनधिकृत बांधकामे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटीत होत असतानाही महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

वसई : पर्यावरणाला घातक अशी अनधिकृत बांधकामे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटीत होत असतानाही महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

महामार्गावरील चिंचोटी हा धबधबे,हिरवीगार वनराई आणि नदी-नाल्यांनी परिपुर्ण असा निर्सगरम्य परिसर आता अनधिकृत बांधकामांचा परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.या परिसरातील सुमारे विस एकरांमध्ये व्यापारी आणि औद्योगिक अनधिकृत गाळे मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत आहेत. कामण-भिवंडी राज्य मार्ग आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत चिंचोटीचा परिसर येत असल्यामुळे येथील जमिनींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. चिंचोटी मुंबई, ठाण्यालगत असल्यामुळे या गावात अनधिकृत स्टुडिओही मोठ्या प्रमाणात उभे राहिले आहेत. या स्टुडिओत सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसल्यामुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात आगी लागून लाखो रुपयांची हानी झाली आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

अनधिकृत बांधकामे करण्यासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची आणि पालिकेच्या कारवाईची शक्यता नसल्यामुळे शेकडो बांधकामे या परिसरात आ वासून उभी राहिली आहेत. अनधिकृत बांधकामांना घरपट्ट्या लावल्या जात नसल्यामुळे आणि अधिकृत बांधकामे होत नसल्यामुळे पालिकेचा चिंचोटी परिसरातील कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. या बांधकामांना नोटीसा देणे,एमआरटीपी लावणे अशी थातुरमातुर कारवाई पालिकेकडून करण्यात येते. ही बांधकामे तोडण्यात यावीत यासाठी जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. तरीही येथील बांधकामे फोफावत चालली आहेत. युसुफ कुरेशी याची सर्वाधिक अनधिकृत बांधकामे असल्याच्या तक्रारी आहेत.

चिंचोटीतील अनधिकृत बांधकामांमुळे पालिकेचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला असताना येथील पर्यावरणाचाही मोठ्या प्रणाणात र्‍हास होत चालला आहे. निसर्गरम्य धबधब्याचे पाणी थेट मिसळणार्‍या चिंचोटी नदीच्या पात्रातही अनेक अनधिकृत बांधकामे उभी राहू लागली आहे. त्यामुळे काही दिवसातच ही नदी नामशेष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

येथील अनधिकृत बांधकामांबद्दल नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पालिका आयुक्त गंगाथरण डी यांची तातडीची बैठक नुकतीच बोलावली होती. या बैठकीत गंगाथरण यांची तनपुरे यांनी झाडाझडती घेतली. त्यामुळे चिंचोटीतील बांधकामांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालिकेच्या प्रभाग जी वालीव अंतर्गत चिंचोटी हा परिसर येतो. या प्रभागात अनेक सहाय्यक आयुक्त बदलून गेले. त्यातील काही अधिकार्‍यांनी या बांधकामांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र,तो राजकीय दबाव आणि संरक्षण नसल्यामुळे असफल झाला.

वरिष्ठ अधिकारी पाठीशी राहिले, पोलिसांनी संरक्षण दिले तर राजकीय दबाव झुगारून चिंचोटीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करता येतील. असे एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर स्पष्ट केले.