पहाटेपासून रांग लावूनही अनेकांच्या पदरी निराशा – लसीकरण केंद्रे स्थानिक नेत्यांनी केली काबीज, लस हवी तर वशिल्याचा बुस्टर डोस हवा ?

लसीकरण केंद्रांवर नेत्यांच्या मर्जीतील लोकांना लस(people who are close to politicians getting vaccine) दिली जात असल्यामुळे पहाटे तीन वाजल्यापासून रांगा लावणाऱ्या नागरिकांना लस (vaccination of citizens) मिळेनाशी झाली आहे.

  रविंद्र माने, वसई : अनेक मोफत लसीकरण केंद्रे(vaccination centers) स्थानिक नेत्यांनी काबीज केली आहेत. या नेत्यांच्या मर्जीतील लोकांना लस दिली जात असल्यामुळे पहाटे तीन वाजल्यापासून रांगा लावणाऱ्या नागरिकांना लस (vaccination of citizens) मिळेनाशी झाली आहे.

  कडक लाॅकडाऊनच्या काळातही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालल्यामुळे भयभीत होऊन नागरिकांनी पालिकेच्या मोफत लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पहिली लस घेतल्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील नागरिकांना दुसरी लस मिळालेली नसतानाही सरकारने १ मे पासून १८ वर्ष वयोगटावरील तरूणांना लसीकरणाच्या टप्प्यात आल्यामुळे या गर्दीत आणखीनच भर पडली आहे.

  लस घेण्यासाठी पहाटे ३ वाजल्यापासूनच लसीकरण केंद्रांवर रांगा लागलेल्या असतात.ही संधी साधून २०० रूपये घेऊन आपला नंबर इतर नागरिकांना देण्याचा नवीन धंदा उजेडात आला आहे.

  एकंदर लसीकरणाच्या नावाने संधीसाधुंचा बाजार सुरू असल्याचे समोर आल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.बर्‍याच तरूणांनी लसीकरणासाठी पहाटेच केंद्रांवर रांगा लावल्या होत्या.मात्र महापालिकेकडून फलकावर केवळ २०० जणांचीच यादी लावण्यात आली होती.त्यामुळे लसीकरणासाठी जवळ आलेल्या तरूणांना केवळ या प्रकारामुळे लसीकरण करून घेता आले नाही. महापालिकेच्या अनियोजनाचा फटका शनिवारी शेकडो तरुणांना बसला. रजिस्ट्रेशन करूनदेखील अनेकांना ‘टाइम स्लॉट’ न मिळाल्याने या तरुणाना लस न देताच पोलीस आणि पालिकेने मागे पिटाळले.

  पहिल्या डोसच्या ऑफलाईन लसीकरणासाठी एक रांग, ऑनलाईन लसीकरणासाठी दुसरी रांग,दुसऱ्या डोसाच्या लसीकरणसाठी तिसरी रांग अशा रांगा बघून लोक चक्रावले आहेत.

  काही केंद्रावर सरकारी,पालिका अधिकारी,पॅरामेडिकल कामगार आपल्या ओळखपत्राचा दुरुपयोग करून ओळखीच्या लोकांना केंद्रात प्रवेश मिळवून देत आहेत.माजी नगरसेवक,विविध पक्षाचे स्थानिक पदाधिकारी लसीकरण केंद्राच्या बाहेर ठाण मांडून बसले असून फक्त ओळखीचे आणि मर्जीतल्या लोकांना ते लसीकरणात प्रवेश देत आहेत.

  पहाटे ३ वाजल्यापासून रांग लावूनही लस मिळाली नाही.लसीकरण केंद्र सुरू झाले त्या वेळेला येथील एका माजी नगरसेविकेने आपल्या मर्जीतील लोकांना केंद्रात प्रवेश दिला. परिणामी अनेक नागरिकांना लस न घेता रिकाम्या हाताने परतावे लागले.

  -अश्विनी प्रभू, गृहिणी

  लसीकरण केंद्रात वशिलेबाजी चालत असल्याच्या अनेक तक्रारी मी पालिका अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. लोकप्रतिनिधींनाही याची कल्पना दिली होती.मात्र त्यांनीही दुर्लक्ष केल्यामुळे आता त्यांच्या राजीनाम्याचे फलक लावण्याशिवाय पर्याय उरला नाही.

  - मिलिंद खानोलकर,अध्यक्ष, मी वसईकर अभियान

  सोपारा प्राथमिक आरोग्य बोळींज,उमराळे,पाटणकर पार्क, झालावार पार्क, तुळींज, मनवेलपाडा,आगाशी,विराटनगर अशा अनेक केंद्रात हे प्रकार घडत आहेत.त्यामुळे पहाटे ३ वाजल्यापासून रांग लावूनही सर्वसामान्य नागरिकांना लस घेता येत नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांकडे तशा तक्रारी केल्या आहेत. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या प्रकरणी आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेखा वाळके यांच्याशी संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे त्यांचा फोन बिझी आणि त्यानंतर उत्तर देत नसल्याचे दिसून आले.