डास निर्मूलनासाठी वसई-विरार पालिकेचा अजब उपाय ; जलपर्णी काढून टाकण्याऐवजी नाल्यात ओतले केमिकल

मार्च २०२० ला लॉक डाऊन झाल्यापासून यंदाच्या मार्च २०२१ पर्यंत वसई विरार मधील नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाले आणि तलावावर जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्याखाली डासांनी मोठ्या प्रमाणात आपली उत्पत्ती केली आहे.

  वसई : डास निर्मूलनासाठी जलपर्णी काढून टाकण्याऐवजी नाल्यांमध्ये केमिकल ऑइल ओतण्याचा अजब उपाय वसई-विरार महापालिकेकडून केला जात आहे. त्यामुळे त्रास कमी होण्याऐवजी पालिकेचा खर्चच जास्त होऊ लागला आहे.

  मार्च २०२० ला लॉक डाऊन झाल्यापासून यंदाच्या मार्च २०२१ पर्यंत वसई विरार मधील नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाले आणि तलावावर जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्याखाली डासांनी मोठ्या प्रमाणात आपली उत्पत्ती केली आहे. थंडावा आणि अंधार डासांच्या उत्पत्तीला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. नाल्यांवर वाढलेल्या जलपर्णी खाली पाण्याचा थंडावा मिळतो तर जलपर्णीमुळे सूर्याच्या किरणांपासून बचाव होतो. त्यामुळे जलपर्णी खाली डास आसरा घेतात.

  सायंकाळी अंधार झाल्यावर तिथूनच ते नागरी वस्तीवर हल्ला करतात. डासांच्या या हल्ल्यामुळे पालिका हद्दीतील सर्वच परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत त्यामुळे नाल्यावरील जलपर्णी काढून टाकण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे.
  मात्र मार्चमध्ये नालेसफाईचे टेंडर निघेल.

  एप्रिलमध्ये टेंडर निघेल असे सांगून पालिका अधिकाऱ्यांकडून वेळ मारून नेण्यात येत आहे.जलपर्णी काढून टाकण्याची सातत्याने मागणी होत असल्यामुळे अखेर पालिकेने अजब उपाय शोधला असून जलपर्णी काढून टाकण्याऐवजी नाल्यामध्ये केमिकल ऑइल ओतण्याचे आम सुरू केले आहे.या ऑइलमुळे डास मरतील अशी आशा त्यांना वाटत आहे.

  मात्र जलपर्णी काढून टाकल्यानंतर फवारणी केल्यावरच डासांचा समूळ नाश होईल असे अनेक डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा पालिकेचा अजब उपाय उघडा पडला आहे.

  जलपर्णी खाली केमिकल ऑइल वगैरे टाकून चालणार नाही त्यासाठी जलपर्णी काढून नाले सफाई करणे हाच उत्तम उपाय आहे.

  डॉ.जी.पी.मेन, माजी वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद

  जलपर्णी काढून टाकण्यासाठी नालेसफाईचे टेंडर लवकरच निघणार आहे.

  प्रभाकर धुमाळ ,आरोग्य निरीक्षक, वसई-विरार महापालिका