ventilator

व्हेंटिलेटर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे सामान्यांना जीव गमवावा लागत असताना पालघरसाठी(Palghar) असलेले १० व्हेंटिलेटर ठाणे(Thane) जिल्ह्याला (Ventilator)का देण्यात आले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    संतोष चुरी, पालघर: संपूर्ण पालघर जिल्ह्यात(Palghar ) कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून ऑक्सिजन व व्हेंटिलेटर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे सामान्यांना जीव गमवावा लागत असताना पालघरसाठी असलेले १० व्हेंटिलेटर ठाणे जिल्ह्याला (Ventilator)का देण्यात आले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेने मृत्युदर वाढत आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा पूर्णपणे हतबल झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना वणवण करावी लागत आहे .परिणामी या रुग्णांना जिल्ह्याबाहेर हलवावे लागत आहे.

    आपण ठाणे जिल्ह्याची दुसरी काही मदत केली नाही. व्हेंटिलेटर दिले. वरून सांगितले म्हणून आपण ते दिले.

    - डॉ किरण महाजन, उपजिल्हाधिकारी, पालघर

    पालघर जिल्ह्यात ऑक्सिजन बेड व्हेंटिलेटर वाढवण्यास आरोग्य यंत्रणा कमी पडत असून जिल्हा प्रशासनसुद्धा हतबल झालेले असताना आपल्या जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. व्हेंटिलेटर अभावी वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे, असे असताना सुद्धा जिल्ह्यासाठी असलेली   व्हेंटिलेटर ठाणे जिल्ह्याने कसे काय पळवले ? असा प्रश्न विचारला जात आहे.

    प्रशासनाने जर पालघरचे व्हेंटिलेटर ठाण्याला दिले असतील तर ते चुकीचे आहे. आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत आहेत. आपल्या इथल्या रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज असताना दुसऱ्यांना ते देणे हे अत्यंत गैर आहे.

    - राजेंद्र गावित, खासदार ,पालघर लोकसभा

    वसई विरार हा शहरी भाग असेल की पालघर जिल्ह्याचा ग्रामीण भाग संपूर्णपणे सगळा भाग कोरोनाने वेढला आहे. मोठ्या प्रमाणात या संपूर्ण पट्ट्यात मृत्यू दरामध्ये वाढ होत असताना प्रशासनाने ठाणे जिल्ह्याचाही विचार करायला हवा यात दुमत नाही. मात्र पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर अभावी रुग्णांना दुसऱ्या जिल्ह्यात बेड शोधावे लागत आहेत अथवा आपला जीव गमवावा लागत आहे. असे असताना आधीच जिल्ह्यात व्हेंटिलेटरची संख्या कमी असताना असलेले व्हेंटिलेटर ठाणे जिल्ह्याला का पाठवण्यात आले या प्रश्नाचे उत्तर कोण देणार ? निष्पाप लोकांचे जीव वाचवणे महत्त्वाचे असताना कोणाच्या दबावाखाली आरोग्य यंत्रणेने व जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ८९ व्हेंटिलेटर उपलब्ध असल्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील हे १० व्हेंटिलेटर ठाणे जिल्ह्याला का देण्यात आले? यामागे काही राजकीय दबाव आहे का ?असेही विचारले जात आहे.