water supply

कोका कोला(water supply to coca cola) या शीतपेय बनविणाऱ्या कंपनीला वैतरणा नदीतून करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य अमोल पाटील यांनी केली.

  जयेश शेलार, वाडा : वाडा(Wada) तालुक्यातील कुडूस येथील कोका कोला(water supply to coca cola) या शीतपेय बनविणाऱ्या कंपनीला वैतरणा नदीतून करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य अमोल पाटील यांनी केली. याबाबतचा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत ही घेण्यात आला आहे.

  या कंपनीला गांधरे गावाजवळील वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या पंचायत समिती पाटबंधारे विभागाच्या बंधाऱ्यातून पाईप लाईनने पाणीपुरवठा केला जातो. ही पाईप लाईन वाडा – भिवंडी रोडलगत टाकण्यात आली असून ही पाईपलाईन ज्या गावाजवळून जाते त्या गावातील ग्रामस्थांना घरगुती वापरासाठी पाण्याची जोडणी देण्यात आली होती. त्यामुळे येथील शिरीषपाडा, नेहरोली, डोंगरपाडा, खुपरी या गावांसह अन्य गाव – पाड्यांची पाण्याची समस्या सुटली होती.

  मात्र गेल्या काही दिवसांपासून कोका कोला कंपनीने या गावांना दिलेला पाणीपुरवठा थांबविल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर स्थानिक पंचायत समिती सदस्य अमोल पाटील यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव घेवून वैतरणा नदीतून केला जाणारा पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी केली आहे.

  दरम्यान कोका कोला कंपनीतील उत्पादन गेल्या १० दिवसांपासून बंद असल्याची माहिती मिळत असून खुपरी ग्रामपंचायत हद्दीतील काही उद्योजकांनी व्यावसायिक वापरासाठी कोका कोलाच्या पाइपलाईनमधून अनधिकृतपणे पाण्याच्या जोडण्या घेतल्याचे आढळून आले.

  घरगुती पाणी वापरासाठी आमची हरकत नाही मात्र पाण्याचा व्यावसायिक कारणासाठी वापर करणे नियमबाह्य असल्याचे कोका कोला कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

  कोका कोला कंपनीला शासनाकडून पाण्याचा व्यावसायिक दर लावला जातो. मात्र कंपनीच्या पाइपलाईनमधून स्थानिकांना घरगुती वापरासाठी जे पाणी दिले जाते व तो पाणीपुरवठा नियमित करण्यास कंपनीची तयारी असून त्यासाठी घरगुती वापराच्या पाण्यासाठी शासनाकडून घरगुती दर लावला जावा, अशी मागणीही कंपनीकडून केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

  वैतरणा बंधाऱ्यातून कोका कोला कंपनीला पाणीपुरवठा होतो. याच पाइपलाईनमधून स्थानिकांना दिले जाणारे पाणी ऐन पाणी टंचाईच्या काळात काही दिवसांपासून कंपनीकडून बंद करण्यात आले आहे. हा पाणीपुरवठा त्वरित सुरू करावा.
  – अमोल पाटील, पंचायत समिती सदस्य, वाडा