iron rod

ट्रान्सफॉर्मरच्या फाऊंडेशनचे गंजलेले लोखंडी खांब(iron pole of transformer) बदलण्याच्या मागणीकडे महावितरणकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  विनायक पवार, बोईसर : नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर(transformer) बदलताना गंजलेला लोखंडी खांब तुटल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.मात्र क्रेन चालकाने प्रसंगावधानामुळे(Presence of Mind) दुर्घटना टळली. यावेळी खांबांवर चढलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. ट्रान्सफॉर्मरच्या फाऊंडेशनचे गंजलेले लोखंडी खांब बदलण्याच्या मागणीकडे महावितरणकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप सरपंच राकेश तरे यांनी केला आहे.

  मुरबे ग्रामपंचायतीच्या बंदर पाड्यातील ट्रान्सफॉर्मर कायम नादुरुस्त होत असतो.या ट्रान्सफॉर्मरच्या फाऊंडेशनचे लोखंडी खांब गंजल्याने ट्रान्सफॉर्मर कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.त्यामुळे बंदर पाड्यात ट्रान्सफॉर्म साठी नवीन लोखंडी खांब तयार करून ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी ग्रामपंचायतीमार्फत महावितरणकडे करण्यात आली होती.

  ट्रान्सफॉर्मर बदलताना फाऊंडेशनचा चॅनल सटकला होता.मात्र अपघात झालेला नाही. ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध करून दिल्यानंतर दोन दिवसांत नवीन फाऊंडेशन तयार करण्याचे काम सुरू करण्यात येईल.

  - रुपेश पाटील,अभियंता,महावितरण

  शनिवारी ट्रान्सफॉर्मर खराब झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सुरू असताना फाऊंडेशनचा लोखंडी खांब तुटला. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.मात्र क्रेन चालकाने ट्रान्सफॉर्मर आणि लोखंडी फाऊंडेशनला आधार दिल्याने अपघात टळला.यावेळी फाऊंडेशनवर महावितरणचे कर्मचारी लटकून राहिल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना खाली उतरवण्यात आले.

  ट्रान्सफॉर्मरच्या निकृष्ट फाऊंडेशन संदर्भात वारंवार महावितरण विभागाला तक्रार करूनही दिरंगाई केली जात आहे. आज नादुरुस्त ट्रान्सफॉरमरच्या जागी पर्यायी दुसरा बसविताना संपूर्ण डीपीसी सेट तुटल्याने मोठा अपघात होता होता वाचला. महावितरण कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून पुन्हा त्याच खराब फाऊंडेशनवर ट्रान्सफॉर्मर उभा करण्यात आला आहे.

  - राकेश तरे,सरपंच, मुरबे

  बंदर पाड्यातील ट्रान्सफॉर्मर गेल्या चार दिवसांत दोन वेळा नादुरुस्त झाला आहे.  लोखंडी खांब गंजल्याने वर ट्रान्सफॉर्मर बदलताना अपघात होण्याची शक्यता असल्याने नवीन फाउंडेशन तयार मागणी सरपंच राकेश तरे यांनी केली आहे.