dahanu accident

चारोटी ते शेरे पंजाब हॉटेलपर्यंत महामार्गाला सर्व्हिस रोड असूनसुद्धा एशियन पेट्रोल पंप समोरील कट का बंद केला गेला नाही? असा स्थानिक लोकांचा प्रश्न आहे. या ठिकाणी बाईक, रिक्षा, कार, मालवाहक ट्रक, यांचे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. यासाठी महामार्ग प्रशासनाने येथे हा कट बंद करावा किंवा येथे सुद्धा उड्डाणपूल करावा अशी मागणी होत आहे.

डहाणू : मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथील एशियन पेट्रोल पंप व सीएनजी गॅस पॉईंटसमोर सर्व्हिस रोड(charoti asian petrol pump is a accident spot) असतानादेखील रस्त्याला कट ठेवण्यात आला आहे.त्यामुळे त्या ठिकाणी अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी एशियन पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल व काही महिन्यांपूर्वी सीएनजी गॅस केंद्र असल्याने ते भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. महामार्गावर दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी कट ठेवण्यात आला आहे. पेट्रोल पंपावर गाडी निघताना वाहनांची मोठी वर्दळ होत आहे. त्यामुळे वेगाने येणाऱ्या वाहनावर नियंत्रण सुटून मोठे अपघात होतात. सतत अपघाताचे सत्र सुरु असून या जागेवर अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.

चारोटी ते शेरे पंजाब हॉटेलपर्यंत महामार्गाला सर्व्हिस रोड असूनसुद्धा एशियन पेट्रोल पंप समोरील कट का बंद केला गेला नाही? असा स्थानिक लोकांचा प्रश्न आहे. या ठिकाणी बाईक, रिक्षा, कार, मालवाहक ट्रक, यांचे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. यासाठी महामार्ग प्रशासनाने येथे हा कट बंद करावा किंवा येथे सुद्धा उड्डाणपूल करावा अशी मागणी होत आहे.

पूर्वी तर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी या पेट्रोल पंपावर गर्दी होत होती पण आता तर सीएनजी.गॅस केंद्र झाल्याने अनेक प्रवासी वाहने गर्दी करीत आहेत. त्यात येथे जवळपास सीएनजी केंद्र नसल्याने आजूबाजूच्या शेकडो गावातील वाहने येथे येत आहेत. गुजरात येथे वापी व मनोर येथे सीएनजी गॅस भरण्यासाठी जावे लागत असल्याने या केंद्रावर मोठी गर्दी होत असल्याने अपघातात वाढ होत आहे. सकाळपासून सीएनजी भरण्यासाठी मोठी रांग लागून अगदी महामार्गाजवळ वाहने उभी असतात. काही दिवसांपूर्वी तर याच केंद्रावर इको गाडी व रिक्षा यांना मोठया कंटेनरने चिरडले होते. नशिबाने जीवितहानी झाली नाही. मात्र येथे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे .महामार्ग व्यवस्थापन व प्रशासनाने वेळीच योग्य ते पाऊल उचलणे आवश्यक असून देखील या समस्येकडे अधिकारी काना डोळा करीत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे .

या महामार्गावरील एशियन पंपजवळील कटवर होणाऱ्या अपघातासंबंधी व अजून अर्धवट असलेल्या सर्व्हिस रस्त्याविषयी आम्ही आंदोलन केले होते. त्याबाबतीत महामार्ग प्रशासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदन दिले आहे. तरी लवकरात लवकर येथील समस्या सोडवाव्यात व येथील नेहमी होणारे अपघात थांबवावेत,नाही तर पुन्हा मोठे आंदोलन उभारावे लागेल.

- अमित घोडा, माजी आमदार पालघर