नालासोपारामध्ये फोफावतोय अंमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय, ९५ लाखांच्या मालासह नायजेरियन नागरिकाला पोलिसांनी केली अटक

नालासोपारा(Nalasopara) पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्रगती नगरात गेल्या कित्येक वर्षापासून नायजेरीयन्सनी आपला अड्डा जमवला आहे.दारू, गुटखा,चरस,गांजा,अफिम हीराॅइनसारखे अंमली पदार्थ त्यांच्याकडून सर्रास विकले जात आहेत.

    वसई : नायजेरीयन्सचा(Nigerians) अड्डा असलेल्या नालासोपारातील (Nalasopara) प्रगती नगरातून ९५ लाखांच्या अंमली पदार्थांसह एका नायजेरियनला पोलिसांनी अटक केली आहे.

    नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्रगती नगरात गेल्या कित्येक वर्षापासून नायजेरीयन्सनी आपला अड्डा जमवला आहे.दारू, गुटखा,चरस,गांजा,अफिम हीराॅइनसारखे अंमली पदार्थ त्यांच्याकडून सर्रास विकले जात आहेत.

    प्रगती नगरात तर त्यांनी अनधिकृत इमारतीत चित्रपटातील गुंडांचा अड्डा हुबेहुब तयार केला होता.काही महिन्यापूर्वी हा अड्डा जमीनदोस्त करून पोलिसांनी अनेक नायजेरियन्सची धरपकड केली होती.मात्र जामिनावर सुटून आल्यावर पुन्हा ते आपला अंमली पदार्थ विक्रीचा धंदा जोमाने करत असल्याचे उघड होत आहे.

    नायजेरीयन्सच्या नादाला लागून कोरोना काळात बेरोजगार झालेले अनेक तरुण,लहान मुले आणि महिला अंमली पदार्थांची विक्री करीत आहेत.त्यामुळे अंमली पदार्थ विक्रीचा धंदा वाढत चालला असून विक्री करण्यास नकार देणार्‍यांवर संबंधितांकडून हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

    तुळींज पोलिसांनी आतापर्यंत प्रगती नगरात धाड टाकून कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलेले असतानाही,दुप्पट जोमाने नायजेरियन अंमली पदार्थ बाळगत असल्याचे मंगळवारच्या घटनेने उघड झाले आहे. मंगळवारी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून शमीउल्ला सैमीन या नायजेरियन माणसाला अटक करून त्याच्याकडून ९५ लाख ६५ हजार रूपयाचे ड्रग्स हस्तगत गेले आहेत.