बांबूच्या हस्तकलेतून महिलांनी मिळवला स्वयंरोजगार

विक्रमगड: विक्रमगड(Vikramgad) तालुक्याची ओळख म्हणजे आदिवासी तालुका. रोजगाराचे(employment) साधन नसल्याने पोटापाण्यासाठी पाठीवर ओझे घेऊन स्थलांतर करणारी कुटुंब. मात्र गेल्या काही वर्षात येथील स्थलांतराचे प्रमाण कमी झाले आहे.. कारण फक्त भात शेतीवर अवलंबून न राहता येथील आदिवासी शेतकऱ्यांनी मोगरा,गुलाबाबरोबर भाजीपाला लागवड करत रोजगाराची निर्मिती केली. तरीही काही भागात रोजगारासाठी स्थलांतर होतच होते मात्र तेथील महिलांनी एकत्र येत त्यावर देखील उपाय काढत बांबूपासून विविध शोभेच्या वस्तू बनवून कुटुंबाला आर्थिक हातभार लावून हे स्थलांतर थांबविण्याचे काम करत आहेत.

विक्रमगड तालुक्यातील टेटवाली या गावातील महिलांनी बचत गट(women saving group) स्थापन करून केशव सृष्टी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मागील वर्षी एक महिना गावातच बांबूपासून बनविलेल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या कलेचे प्रशिक्षण घेतले आहे. आधीच बांबूच्या(bamboo) विणकामाची कला अंगभूत असलेल्या या महिलांच्या कलेला या प्रशिक्षणामुळे अधिकच धार आली आहे. या प्रशिक्षणानंतर त्यांनी बांबूपासून विविध आकर्षक वस्तू बनविण्यास सुरवात केली आहे. यामध्ये त्यांनी आकर्षक मोबाईल स्टँड, रिक्षा, चहा तसेच पाण्यासाठीचे ट्रे ,हळद-कुंकू ठेण्यासाठी करंटा, ,पेपर वेट, विविध प्रकारच्या ट्रॉफी अशा प्रकारच्या वस्तू बनविल्या आहेत. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे या वस्तूंची मागणी घटली आहे.
मात्र केशवसृष्टीच्या माध्यमातून सध्या त्यांच्याकडे एक हजार आकाशकंदीलाची मागणी आली आहे. हे एक हजार आकाशकंदील बनविण्यासाठी त्यांना जवळपास एक महिना लागणार असून एका आकाश कंदीलांची किंमत ३५० ते ४०० रुपये मिळणार आहे. या आकाश कंदीलासाठी लागणारे बांबू गावताच मिळत असून एका बांबूसाठी त्यांना ४० रुपये मोजावे लागतात. भविष्यातील बांबूच्या मागणीचा विचार करता या बचतगटाच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड केली आहे.

टेटवाली गावातील या सर्व महिला आणि त्यांना सहकार्य करणारे पुरुष हे वीटभट्टी ,रेती काढण्यासाठी स्थलांतर करत असत तर काहीजण नाका कामगार म्हणून रोजगारासाठी. भटकंती करत असत. यामुळे या कामगारांच्या मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असे. मात्र त्यांनी आपल्या अंगभूत कलेला प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यावसायिक रूप दिल्यानंतर त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्य बदलले असून या कलेच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला देखील स्थैर्य देण्याचे काम करून पर्यावरणाची होणारी हानीदेखील थांबवत आहेत.