औद्योगिक क्षेत्रातील कामगार ठरत आहेत कोरोना सुपर स्प्रेडर, प्रशासनाचे सगळे आदेश कंपन्यांनी बसवले धाब्यावर

कामगारांच्या सुरक्षेबाबत(workers safety) अनेक कंपन्या उदासीन असल्याचे दिसून येत असून(corona spread in companies) त्यामुळे कंपन्यांकडून या कामगारांच्या आरोग्य सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

  जयेश शेलार, वाडा : कंपनीतील कामगारांचा कामाच्या ठिकाणी सातत्याने संपर्क येत असल्याने कामगारांना कोरोना संसर्ग(corona spreade by workers) होण्याचे प्रमाण वाढले आहे. संसर्ग झालेल्या कामगारांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र कामगारांच्या सुरक्षेबाबत अनेक कंपन्या उदासीन असल्याचे दिसून येत असून त्यामुळे कंपन्यांकडून या कामगारांच्या आरोग्य सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

  राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र अर्थचक्र थांबू नये, यासाठी सुरक्षेचे नियम लागू करून उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र अनेक उद्योजक हे नियम धाब्यावर बसवून कामगारांच्या व त्यांच्या जिवाशी खेळ करीत असल्याचे दिसून येत आहे.

  वाडा औद्योगिक क्षेत्रात एक हजारापेक्षा जास्त कंपन्या आहेत. यात हजारो कामगार काम करतात. यात स्थानिक कामगारांबरोबरच मुंबई, ठाणे, कल्याण, वसई या मोठ्या शहरातूनही कामगार येत असतात. त्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. हा संसर्गाचा धोका कमी व्हावा यासाठी कंपन्यांनी दर महिन्याला सर्व कामगारांची कोरोना टेस्ट करण्याचे आदेश वाडा तहसिलदारांकडून देण्यात आले आहेत. मात्र हे आदेश कंपन्यांनी धाब्यावर बसविले असून कामगारांची टेस्ट करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून आहे. तर पॉझिटिव्ह आलेल्या कामगारांना उपचाराची जबाबदारीही कंपन्या नाकारत असून शासकीय कोविड हॉस्पिटलमध्येही बेड उपलब्ध होत नसल्याने कोरोना पॉझिटिव्ह आलेले कामगार व त्यांच्या कुटुंबियांची परवड होताना दिसत आहे.

  कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेसाठी त्यांची कोरोना टेस्ट करावी. पॉझिटिव्ह आलेल्या कामगारांची व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या उपचाराची जबाबदारी कंपनीने घेणे आवश्यक आहे. तसेच कंपन्यांनी पुढाकार घेवून कामगारांना लवकरात लवकर कोरोना लस देण्यास प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.

  - महेंद्र ठाकरे, अध्यक्ष, कोकण विकास कामगार संघटना

  कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या असून तलाठ्यंकडून याबाबत आढावा घेण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई केली जाईल.

  - डॉ. उद्धव कदम, तहसीलदार, वाडा

  दरम्यान वाडा तालुक्यातील कंपन्यांमधील कामगार, खदानी व क्रॅशरमध्ये काम करणारे कामगार यांची कोरोना टेस्ट करून घेण्याचे आदेश वाडा तहसीलदारांनी २२ एप्रिल रोजी काढलेल्या एका पत्राद्वारे दिले आहेत. मात्र या तहसिलदारांच्या आदेशाला अनेक कंपन्या व खदान मालकांनी धाब्यावर बसविल्याचे दिसून येत आहे. तर तालुक्यातील अबिटघर येथील दोन कंपन्यांमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या कामगारांची मोठी परवड झाल्याचे दिसून आले होते. हे पॉझिटिव्ह आलेले कामगार परप्रांतीय होते. मात्र त्यांच्या उपचाराची जबाबदारी कंपनी व ठेकेदार एकमेकांवर ढकलत असल्याचे दिसून आले.