यवतमाळची प्रणाली पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पालघर येथे दाखल

चिखले समुद्रकिनारी तिने स्थानिकांशी भेट घेत, कार्याची माहिती दिली. येथील समृद्ध पर्यावरणाने प्रभावीत झाल्याचे ती म्हणाली. पालघर जिल्ह्यात विविध प्रकल्प येऊ घातल्याने, येथील पर्यावरणाचा ऱ्हास होण्याआधीच स्थानिकांनी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन तिने केले.

  • सायकलने महाराष्ट्र भ्रमंतीचे उद्दिष्ट; डहाणूत साडेसात हजार किमीचा टप्पा गाठला

डहाणू : यवतमाळ जिल्ह्यातील एकवीस वर्षीय प्रणाली चिकटे सायकलने महाराष्ट्राच्या भ्रमंतीला निघाली असून गावोगावी फिरून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहे. शनिवार ३ एप्रिल रोजी नाशिक मार्गे तलासरी आणि त्यानंतर डहाणूत दाखल झाली. तिने साडेसात हजार किमीचा टप्पा पूर्ण केला आहे. विविध प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची भीती असल्याने स्थानिकांनी लढा देण्याचे आवाहन तिने केले.

नाशिक मार्गे शनिवारी तलासरी तालुक्यात प्रणाली दाखल झाली. त्यानंतर बोर्डी आणि डहाणूत स्थानिक पर्यावरणप्रेमी सुर्यहास चौधरी, कुंदन राऊत, अनिरुद्ध पाटील, महेश सुरती यांची भेट घेतली. यावेळी तिने साडेसात हजार किमीचा प्रवास पूर्ण केला असून आतापर्यंत कोणताही अडथळा आला नसल्याचे ती म्हणाली. चिखले समुद्रकिनारी तिने स्थानिकांशी भेट घेत, कार्याची माहिती दिली. येथील समृद्ध पर्यावरणाने प्रभावीत झाल्याचे ती म्हणाली. पालघर जिल्ह्यात विविध प्रकल्प येऊ घातल्याने, येथील पर्यावरणाचा ऱ्हास होण्याआधीच स्थानिकांनी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन तिने केले.

या मोहिमेचा प्रारंभ २० ऑक्टोबर २०२० रोजी तिने यवतमाळ येथून केला. त्यानंतर पश्चिम विदर्भ, नंदुरबार, नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील विविध गावांना भेट देणार आहे. ठाणे आणि त्यानंतर कोकणात ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती करून घरी परतणार असल्याचे प्रणालीने सांगितले.

प्रणाली ही यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्याच्या पुनवट येथील, शेतकरी कुटुंबातील असून तीन बहीणींपैकी शेंडेफळ आहे. चिकटे कुटुंबीय शेतीवर उदरनिर्वाह करतो, मात्र अपेक्षे पेक्षा उत्पादन कमी मिळते. त्याला पर्यावरण बदल आणि ऱ्हास जबाबदार असल्याचे बीएसडब्ल्यूचे शिक्षण घेतलेल्या प्रणालीला जाणीव झाली. पर्यावरण संरक्षणाची चळवळ महाराष्ट्रभर पोहचविण्यासाठी तिने सायकलने भ्रमंती करण्याचे ठरवले.

खेडोपाड्यासह शहरी भागात सायकलने पोहचणे शक्य आहे. भटकंतीसाठी कोणताही खर्च येत नसून थेट लोकांशी संपर्क साधत पर्यावरणाचा संदेश देता येतो. त्या-त्या ठिकाणचे भौगोलिक ज्ञान व पर्यावरणाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करता येतो, वायू, ध्वनी टाळण्यासाठी सायकल वापरा, प्लास्टिकचा वापर टाळून व कापडी पिशव्या वापर, वृक्षारोपण करून झाडे जगवा, परिसर स्वच्छता इ. उद्देश तिने स्पष्ट केले.