sanjay jadhav

संजय जाधव यांनी तक्रार अर्जात असे म्हटले आहे की, मला मारण्यासाठी परभणीतून दोन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे. नांदेडमधील एका मोठ्या टोळीने कट रचला असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तसेच मला जीवे मारण्याची सुपारी देणारा व्यक्ती हा परभणीतील असावा' असा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे.

परभणी : शिवसेना खासदार संजय जाधव यांनी जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली आहे. सोमवारी मंगळवारी रात्री उशिरा नानलपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. शिवसेना खासदार संजय जाधव यांनी स्वतः ही तक्रार दाखल केली आहे.

संजय जाधव यांनी तक्रार अर्जात असे म्हटले आहे की, मला मारण्यासाठी परभणीतून दोन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे. नांदेडमधील एका मोठ्या टोळीने कट रचला असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तसेच मला जीवे मारण्याची सुपारी देणारा व्यक्ती हा परभणीतील असावा’ असा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे. माझ्या एका विश्वासू व्यक्तीने मला ही माहिती दिली आहे, असेही संजय जाधव यांनी पोलिसात तक्रार करताना सांगितले.

या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता नानलपेठ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली आहे. दरम्यान खासदारांच्या जीवावर उठलेला हा व्यक्ती नेमका कोण? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

कोण आहेत संजय जाधव?

संजय जाधव हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत.

परभणी विधानसभा मतदारसंघातून ते २००९ ते २०१४ दरम्यान आमदार म्हणून निवडून आले होते.

२०१४ मध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांचा पराभव केला होता.

या निवडणुकीत जाधव यांना ५ लाख ७८ हजार ४५५ मते मिळाली होती.

केंद्र सरकारच्या स्थायी समिती आणि कृषी मंत्रालयाच्या समितीवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.