‘न्याय मिळत नसेल तर सत्तेत असण्याचा काय उपयोग’, निधीवरुन अशोक चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र, आघाडीत पुन्हा बिघाडी

काँग्रेस (Congress) महापालिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)  निधी देत नाहीत, असा गंभीर आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला आहे. न्याय मिळत नसेल तर सत्तेत राहण्याचा काय उपयोग, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले आहे.

परभणी : काँग्रेस (Congress) महापालिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)  निधी देत नाहीत, असा गंभीर आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला आहे. न्याय मिळत नसेल तर सत्तेत राहण्याचा काय उपयोग, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले आहे.

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही खंत व्यक्त केली. मराठवाड्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असून, या भागासाठी अधिक निधी मिळवण्यासाठी आग्रही राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  ‘काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मी निधी मिळवून दिला. सत्तेत असताना आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, या मताचा मी आहे. पण दुर्दैवाने कोरोनामुळे ३० टक्केच निधी मिळाला, मराठवाड्याला जास्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार.’

दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेसोबत जाण्यास फारसे उत्सुक नसल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. पण राज्यात काँग्रेसला संपविण्याचा प्रयत्न भाजपाकडून सातत्याने होत आहे, अशा वेळी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत व्हावा अशी कार्यकर्त्यांची आणि काही नेत्यांची इच्छा असल्याने शिवसेनेसोबत सत्ता स्थपन करण्याचा निर्णय घेतला असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

'विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते. पण राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकासआघाडी प्रत्यक्षात आली. दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत युती करायची की नाही, या संभ्रमात होते. पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मत होते. भाजपने काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत जाण्यास तयार झाला.’

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकराच्या कारभारावरही त्यांनी यावेळी टीका केली. कृषी सुधारणा कायद्यांमुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होईल, त्यामुळे हा कायदा राज्यात लागू होऊ नये अशी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला दुय्यम स्थान मिळत असल्याचे नेहमीच पाहायला मिळाले आहे. यानिमित्ताने अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांच्या मनातील खंत व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीतील ही कुरबूर बाहेर आल्याने, आता याला शिवसेना आणि राष्ट्रवादी कसे प्रत्युत्तर देतात, हे पाहवे लागणार आहे.