The couple will be dreaming of becoming the Chief Minister; Devendra Fadnavis and Narayan Rane mocked the NCP leader

देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे जोडीने मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहतील अशी मिश्किल टोलेबाजी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे. परभणीत प्रसारमाध्यमांशी बोलताना मलिक यांनी भाजप नेत्यांवर चौफेर टीका केली.

    परभणी : देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे जोडीने मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहतील अशी मिश्किल टोलेबाजी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे. परभणीत प्रसारमाध्यमांशी बोलताना मलिक यांनी भाजप नेत्यांवर चौफेर टीका केली.

    मागील २२ वर्षांपासून नारायण राणे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना आता जोडीदार म्हणून देवेंद्र फडणवीस भेटलेत असा खोचक टोला मलिकांनी लगवाला आहे. शिवसेनेसह युती तोडल्यापासून भाजपची काय अवस्था झालेय हे सगळ्यांनाच चांगले माहिती आहे असे म्हणत मलिकांनी भाजपवर निशाणा साधला.

    देवेंद्र फडणवीस वारंवार आम्ही भविष्यात फासे फिरवू, अशी भाषा करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी ज्योतिष विद्या कुठून शिकली, हे आम्हाला माहिती नाही. पण आमचा ज्योतिष विद्येवर विश्वास नसल्याचे म्हणत मलिक यांनी त्यांचा सत्ता स्थापनेचा दावा खोडून काढला.

    काही दिवसांपूर्वीच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावर ही मलिकांनी भाष्य केले. भाजपचे नेते सातत्याने मुख्यमंत्र्यांना भेटतात. भेटीनंतर हे नेते वादग्रस्त वक्तव्य करुन महाविकासआघाडीचे राज्यातील सरकार पाडण्यासाठी वातावरणनिर्मिती करु पाहत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय.