गणरायाला ५०० पुस्तकांचा अनोखा महानैवेद्य

साईनाथ मंडळ ट्रस्टच्यावतीने गणपतीला साहित्याची पूजा; विविध संस्थांना देणार पुस्तकरुपी प्रसाद

पुणे : सर्व कलांचा अधिपती हा गणपती आहे. या गणरायाला वंदन करण्यासाठी बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने तब्बल ५०० हून अधिक पुस्तकांचा अनोखा महानैवेद्य दाखविण्यात आला. या नैवेद्याचा पुस्तकरुपी प्रसाद विविध संस्थाना आणि ग्रंथालयांना देण्यात येणार आहे. यावेळी ऋषीमुनींच्या वेशातील आणि सरस्वतीच्या वेशातील मुलांनी उपक्रमात सहभाग घेतला.

गणेशोत्सवांतर्गत मंडळातर्फे गणपतीला पुस्तकांचा नैवेदय दाखवित साहित्याची पूजा करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष पीयुष शाह, सिद्धार्थ ग्रंथालयाचे दिलीप भिकुले,स्वाधार संस्थेच्या सुवर्णा पोटफोडे, एकलव्य न्यासचे मल्हारी कांबळे, चैतन्य हास्य योग्य मंडळाचे प्रसाद नलगे, रामभाऊ दहाड, प्रल्हाद थोरात, हर्षल परदेशी, अभिषेक मारणे, गोविंदा वरणचंदानी, राजू शेडगे, सदाशिव कुंदेन, सारिका पाटणकर, आश्विनी देशपांडे, शंकर रजपूत उपस्थित होते.

सुनिता राजे पवार म्हणाल्या, साहित्य ही एक अशी कला आहे, ज्याने मानवी जीवन अतिशय सुंदर आणि समृद्ध होते. माणूस बनण्यासाठी आवश्यक गोष्टी साहित्यातून मिळतात. साहित्यातील लेखन ही त्या-त्या काळाची अभिव्यक्ती आहे. लेखनातूनच इतिहास मांडला जातो आणि सांगितला जातो. प्रत्येक काळाचा प्रवक्ता साहित्य असते,असेही त्यांनी सांगितले.

पीयुष शाह म्हणाले, कोरोनामुळे मुलांना घराबाहेर पडता येत नाही. ग्रंथालये देखील बंद आहेत. त्यामुळे आज गणपतीला पुस्तकांचा नैवेद्य दाखवून साहित्याची पूजा करण्यात आली. आणि त्याचा पुस्तकरुपी प्रसाद विद्यार्थ्यांना देण्यात आला. प्रसाद भडसावळे यांनी प्रास्ताविक केले. पीयुष शहा यांनी सूत्रसंचालन केले.