theft

पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसोंदिवस वाढ होत चालली आहे. ऐन गणेशत्सवात चोरीच्या घटना उघडकीस यायला लागल्या आहेत. सदाशिव पेठेसह आंबेगाव बुद्रूकमध्ये तब्बल ११ लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे.

पुणे : पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसोंदिवस वाढ होत चालली आहे. ऐन गणेशत्सवात चोरीच्या घटना उघडकीस यायला लागल्या आहेत. सदाशिव पेठेसह आंबेगाव बुद्रूकमध्ये तब्बल ११ लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. सदाशिव पेठेतील विजयानगर येथून ६ लाख ३१ हजारांचा ऐवज चोरुन नेला. बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ही चोरी करण्यात आली. तसेच आंबेगाव बुद्रूकमधून ४ लाख ४५ हजारांची चोरी करण्यात आली.
या संबंधी विजयानगर कॉलनीतील रहिवासी आशुतोष गांधी (वय ३५) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी यांचा दिनार अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. काल मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून १ लाख ५८ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने मिळून ६ लाख ३१ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळे तपास करत आहेत.
आंबेगाव बुद्रुक परिसरातील जाई अपार्टमेंटमधील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ३ लाख १५ हजारांचे दागिने लांबविले. त्याशिवाय घरातून मोटारीची चावी घेउन पार्किंगमधील मोटार चोरुन नेली आहे. याप्रकरणी सतीश कमलेकर (वय ४५) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सतीश हे जांभुळवाडी रोडवरील जाई अपार्टमेंट येथे दुसऱ्या मजल्यावर राहतात. दोन दिवसांपुर्वी ते कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील दागिने व रोकड ताब्यात घेतली. त्यानंतर चोरट्यांनी सतीश यांच्या घरातून मोटारीची चावी घेऊन पार्किंगमधील मोटार चोरुन नेली आहे.