करवीर निवासिनी अंबाबाईची आकर्षक छायाचित्रे होतायत व्हायरल

समीर मुजावर, कोल्हापूर : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील विजेचे दिवे मालवून समयांच्या प्रकाशात काढलेली छायाचित्रे कालपासून मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.

 समीर मुजावर, कोल्हापूर : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील विजेचे दिवे मालवून समयांच्या प्रकाशात काढलेली छायाचित्रे कालपासून मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. देवीची ही आकर्षक छायाचित्रे पाहून तमाम देशभरातील अंबाबाई भक्त मात्र सुखावून गेला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन कधी एकदा देवी अंबाबाईचे दर्शन घेता येईल अशा प्रतिक्रिया या लाखो भक्तांच्या तोंडी आपसूकच उमटत आहेत.

गेल्या तीन महिन्यापासून कोल्हापूरच्या आई अंबाबाईच्या प्राचीन मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारा भक्तांचा ओघ थंडावला आहे. असे असले तरी तीन महिन्यापासून देवीच्या मंदिरात पुजारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माध्यमातून देवीचे नित्यनियमाने होणारे पूजाअर्चा आणि अन्य सोपस्कार मात्र अखंडपणे सुरू आहेत.

काल सायंकाळी अचानक समाज माध्यमांवर देवीच्या मंदिरात गाभाऱ्यातील अंबाबाई मूर्तीची सर्व विजेचे दिवे मालवून आणि समयांच्या निरांजनाच्या संधी प्रकाशात काढण्यात आलेली छायाचित्रे व्हायरल झाली. ही छायाचित्रे पाहून देवीचे देशभरातील भक्त सुखावून गेले.

देवीची ही आकर्षक छायाचित्रे पाहून कित्येकांनी मोठ्या भक्तीने आपले हात जोडून देवीजवळ सगळे काही सुरळीत होऊ दे..कोरोनाचे तांडव आटोक्यात येऊ दे.सर्वांची प्रकृती व्यवस्थित असू दे.ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांचे देवी रक्षण करू दे, अशी प्रार्थना केली.