हिमाचल प्रदेशातील सफरचंदाची आवक सुरू

चवीने गोड आणि लाल रंगाच्या देशी सफरचंदाची आवक हिमाचल प्रदेशातून सुरू झाली आहे. यंदाच्या वर्षी सिमला सफरचंदाचा हंगाम काहीसा लांबणीवर पडला होता.

श्रावण महिन्यात देशी सफरचंदाच्या मागणीत वाढ

पुणे : चवीने गोड आणि लाल रंगाच्या देशी सफरचंदाची आवक हिमाचल प्रदेशातून सुरू झाली आहे. यंदाच्या वर्षी सिमला सफरचंदाचा हंगाम काहीसा लांबणीवर पडला होता.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात गेल्या काही दिवसांपासून सिमला सफरचंदाची आवक सुरू झाली असून १५ ऑगस्टनंतर सफरचंदाची आवक वाढेल, अशी माहिती फळबाजारातील व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली. हिमाचल प्रदेशातील सफरचंद थेट बाजारात विक्रीस पाठविण्यात येत आहेत. परदेशी सफरचंदे शीतगृहात ठेवण्यात येतात. परदेशी सफरचंदांच्या तुलनेत हिमाचल प्रदेशातील सफरचंद ताजी असतात, तसेच आरोग्याच्या दृष्टीने या सफरचंदाचे सेवन करणे हितकारक असते. श्रावण महिन्यात देशी सफरचंदाच्या मागणीत वाढ होते. देशी सफरचंदाचा हंगाम नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू असतो. यंदा करोनाचा संसर्ग असल्याने हिमाचल प्रदेशातून होणारी सफरचंदाची आवक लांबणीवर पडली. हिमाचल प्रदेशातून पुण्यातील बाजारात सफरचंद येण्यास तीन ते चार दिवस लागतात. हिमाचल प्रदेशातील बागेतून ताजी सफरचंदे बाजारात विक्रीस पाठविण्यात येतात, असे त्यांनी सांगितले.घाऊक फळबाजारात सफरचंदाच्या पेटीचा दर (२५ ते ३० किलो) दर प्रतवारीनुसार १८०० ते ४२०० रुपये आहे.