संविधान, राष्ट्रध्वजाच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांची : श्रीपाल सबनीस

परकीय आक्रमणं होत असताना आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता, संविधान, राष्ट्रध्वज या सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. भारतीय संविधानामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, समता याला महत्त्व आहे.

पिंपरी : परकीय आक्रमणं होत असताना आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता, संविधान, राष्ट्रध्वज या सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. भारतीय संविधानामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, समता याला महत्त्व आहे. तेवढच महत्त्व सामाजिक न्यायाला आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या माध्यमातून १ ते ५ऑगस्ट दरम्यान वेबिनारद्वारे आयोजित करण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारप्रबोधन पर्व २०२०च्या आजच्या चौथ्या दिवशी “सामाजिक न्यायाची समीक्षा” या विषयावरील परिसंवादामध्ये ते बोलत होते. सबनीस म्हणाले,  पाकिस्तान व चीन सारख्या देशांचा आपण एकत्र येऊन प्रतिकार केल्याशिवाय भारतीय संविधानाला अपेक्षित असलेल्या सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला आपण न्याय देऊ शकत नाही. तसेच वेबिनारच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांचे विचार प्रबोधन घेणारी पिंपरी-चिंचवड पालिका हि देशातील एकमेव पालिका आहे, असेही ते म्हणाले.

-जाती व्यवस्था नष्ट करणे आवश्यक

परिसंवादामध्ये सहभागी झालेले अजित केसराळीकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून पंचसुत्रीद्वारे सामाजिक न्याय देणारी लोकशाही या देशाला अर्पण केली. देशामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी जाती व्यवस्था नष्ट करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

ॲड. भूपेंद्र शेंडगे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांचा एक पोवाडा ऐकून रशियातील लोक जागृत होऊन आपल्या देशात अध्ययनासाठी येतात. आपण देखील त्यांच्या साहित्यातून प्रेरित होणं आवश्यक आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारप्रबोधन पर्व २०२० च्या आजच्या दिवसाची सुरुवात सनई वादक सोनू काळोखे यांच्या पारंपरिक सनई वादनाद्वारे करण्यात आली. ॲड. श्रीधर कसबेकर म्हणाले, सामाजिक न्यायाची चिकित्सा करणे आज आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला आहे का हे पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर महादेव खंडागळे आणि संच यांच्या प्रबोधनात्मक गीतांच्या कार्यक्रमाने प्रबोधन परवाच्या चौथ्या दिवसाची सांगता करण्यात आली. यावेळी अतिरिक आयुक्त प्रवीण तुपे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व समितीचे अध्यक्ष दत्तु चव्हाण, सचिव संजय ससाणे, कार्याध्यक्ष नितीन घोलप, खजिनदार शिवाजी साळवे, मुख्य संघटक मेघराज साळवे, भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, प्रा.धनंजय भिसे, हनुमंत कसबे, मनोज तोरडमल, अरुण जोगदंड आदी उपस्थित होते.