पुण्यात राबविणार ‘कोरोना मुक्त रिक्षा’ उपक्रम

रिक्षा पंचायातीतर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुण्यात 'कोरोना मुक्त रिक्षा' हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी खास १०० रिक्षांची सोय केली असून कोरोनाचा वाढत्या संकटात देखील रिक्षांमधून सुरक्षित प्रवास करता यावा हा या उपक्रमा मागचा उद्देश आहे.

पुणे : रिक्षा पंचायातीतर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुण्यात  ‘कोरोना मुक्त रिक्षा’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी खास १०० रिक्षांची सोय केली असून कोरोनाचा वाढत्या संकटात देखील रिक्षांमधून सुरक्षित प्रवास करता यावा हा या उपक्रमा मागचा उद्देश आहे.  या उपक्रमांतर्गत वापरणाऱ्या रिक्षांमध्ये चालक आणि प्रवासी यांमध्ये पारदर्शक पडदा लावण्यात येणार आहे तसेच रिक्षामध्ये सॅनिटायझर वारंवार वापरण्यात येणार आहे. प्रवासी आणि चालक दोघांसाठीही मास्क वापरणे बंधनकारक राहील. 

या ताफ्याला आज (शुक्रवारी)सायंकाळी ४ वाजता विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विभागीय कार्यालयाच्या आवारातून झेंडा दाखविला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर होणारा हा उपक्रम औचित्यपूर्ण व दिशादर्शक ठरेल. यामुळे मिशन बिगिन अगेन लाही बळ मिळणार आहे, असे रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी सांगितले.

लॉकडाऊन शिथिल झाल्यावर १ ऑगस्टपासून प्रवासी सेवा देण्यासाठी ऑटो रिक्षा खुल्या झाल्या आहेत. तरीही एकूण रिक्षांपैकी २५-३० टक्केच रिक्षा सध्या रस्त्यावर आहेत. प्रवाशांच्या मनातील कोरोनाची भीती घालवण्यासाठी आणि प्रवास करताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘कोरोना मुक्त रिक्षा’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.