मनसेच्या कार्यकर्त्यांकडून विद्युत वितरण कार्यालयाची तोडफोड

सध्याच्या कोरोना काळात जनता मेटाकुटीला आली असून सर्वसामान्य नागरिकांना ज्यादा व अवाढव्य वीजबिले दिल्याने याच्या विरोधात शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने शिरूर वीज वितरण कार्यालयात आंदोलन करण्यात आले.

शिरूर तालुक्यातील खळबळजनक प्रकार

शिक्रापूर :  सध्याच्या कोरोना काळात जनता मेटाकुटीला आली असून सर्वसामान्य नागरिकांना ज्यादा व अवाढव्य वीजबिले दिल्याने याच्या विरोधात शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने शिरूर वीज वितरण कार्यालयात आंदोलन करण्यात आले.  आंदोलनकर्त्यांनी आज वीज कार्यालयातील उप कार्यकारी अभियंता हितेंद्र भिरुड यांचे केबिनची तोडफोड करत खळखट्याळ आंदोलन केले. 

 शहरात नागरिकांना कोरोना काळामध्ये देखील अवाढव्य असे वीजबिल येत असल्याने या वीज बिलाच्या विरोधात शिरूर शहर मनसे व मनसे जनहित कक्ष यांनी वीजवितरण कंपनीची हंडी फोडत मनसे स्टाईलने आंदोलन केले असून या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष अविनाश घोगरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष सुशांत कुटे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष रवींद्र गुळादे आदींनी शिरूर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात आंदोलन केले. यावेळी बोलताना शिरूर शहरासह नागरिकांना मार्च महिन्यापासून वाढीव बिले आली असून कोरोना काळात नागरिक अडचणीत आले असताना जादा वीज बिल कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक वीज वितरण कार्यालयात चकरा मारत आहे. परंतु अधिकारी जागेवर नाहीत. आधीच कोरोनामुळे नागरिक मेटाकुटीला आले असताना देखील विद्युत वितरण कंपनी वाढीव बिले देऊन नागरिकांना अडचणीत आणत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. तर याबाबत सात ऑगस्ट रोजी उपकार्यकारी अभियंता हितेंद्र भिरूड यांना भेटून याबाबत माहिती दिली परंतु ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. मग आज वीज वितरण कंपनीचे कार्यालया बाहेर अनेक नागरिक वीज बिले कमी करण्यासाठी आली होती परंतु अधिकारी नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे. यामुळे अधिकारी यांचे कार्यालय संतप्त मनसे सैनकांनी फोडून आंदोलन केले असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष सुशांत कुटे व सांगितले यावेळी येथील टेबल, खुर्ची, काच आदी साहित्यांचे आंदोलनात नुकसान झाले आहे.