मुळशी धरणातून होणार पाण्याचा विसर्ग; धरणाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गेल्या काही दिवसापासून शहरात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शहरातील जवळ जवळ सर्व धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत.

पुणे : गेल्या काही दिवसापासून शहरात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शहरातील जवळ जवळ सर्व धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत. यातच मुळशी धरण याचं जोराच्या पावसामुळे सुमारे ८५ टक्के भरले आहे. धरण भरल्या कारणाने धरणातून मुळा नदीत पाणी सोडण्‍यास सुरवात करण्‍यात येणार आहे. उद्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नदीपात्रालगतच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे.

मुळशीच्‍या पश्चिम पट्ट्यातील घाटमाथ्‍यांवरील ताम्हिणी घाट, पिंपरी, दावडी, आंबवणे, शिरगाव परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. धरणात सध्या  ४४२.९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे.  उद्या होणाऱ्या विसर्गामुळे नदीकाठची गावे धोक्यात येऊ शकतात त्यामुळे नदीकाठच्‍या मोटारी काढणे, गुरांना नदीपात्रापासून लांब ठेवणे, नदीपात्रात प्रवेश न करणे आदी सुरक्षिततेच्‍या सूचना टाटा कंपनी आणि प्रशासनाने दिल्‍या आहेत. उद्या सकाळी ११ वाजल्यापासून हा विसर्ग सुरू होणार आहे.