corona virus

काल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बारामती, इंदापूर व पुरंदर या तीन तालुक्यांचा दौरा केला या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील रॅपिड अँटीजेन टेस्टची संख्या वाढविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

बारामती : काल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बारामती, इंदापूर व पुरंदर या तीन तालुक्यांचा दौरा केला या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील रॅपिड अँटीजेन टेस्टची संख्या वाढविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेवर अंमलबजावणी करत बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, रुई ग्रामीण रुग्णालय तसेच तालुक्यातील जेथे जास्त रुग्ण मिळाले आहेत. तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येत्या दोन तीन दिवसात या तपासण्या सुरु केल्या जाणार आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

ज्या प्रमाणात टेस्टची संख्या वाढेल त्या प्रमाणात रुग्ण संख्या देखील वाढेल असे गृहीत धरून स्थानिक प्रशासनाने बेडसची संख्याही वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात सध्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात ७२, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १६२ तर रुई येथे ३० बेडसची सोय उपलब्ध आहे. माळेगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहात आज १०० बेडस तयार झालेले असून येथे १६८ बेडसची क्षमता करण्यात येणार असल्याचे डॉ. खोमणे यांनी नमूद केले. यात रुई व सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात ज्यांना लक्षणे आहेत असे रुग्ण तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व माळेगाव येथे ज्यांना लक्षणे नाहीत अशा रुग्णांची सोय केली जाणार आहे. दरम्यान बारामती हॉस्पिटल येथे गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना दाखल केले जात आहे. आवश्यकतेनुसार क्षमता वाढविण्याचेही नियोजन प्रशासनाने केले आहे.