कोविडच्या चाचणीसाठी पुण्यात ‘ड्राईव्ह अप’ संकलन केंद्र

नागरिकांसाठी कोविड १९ ची चाचणी अधिक सुलभ व्हावी व जास्तीत जास्त नागरिकांना ती करता यावी यासाठी पुण्यातील जीनपाथ डायग्नोस्टिक्सच्या वतीने खास ‘ड्राईव्ह अप’ स्वॅब संकलन केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

घरबसल्या २४ तासांमध्ये मोबाईलवर मिळणार चाचणीचे निष्कर्ष

पुणे : नागरिकांसाठी कोविड १९ ची चाचणी अधिक सुलभ व्हावी व जास्तीत जास्त नागरिकांना ती करता यावी यासाठी पुण्यातील जीनपाथ डायग्नोस्टिक्सच्या वतीने खास ‘ड्राईव्ह अप’ स्वॅब संकलन केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा प्रकारची शहरातील ही पहिलीच सुविधा असून २४ तासांमध्ये थेट मोबाईलवर नागरिकांना या चाचणीचे निष्कर्ष पाहता येणार आहेत.  

डॉ.निखिल फडके यांनी २००८ साली सुरु केलेल्या जीनपाथ डायग्नोस्टिक्समध्ये मागील ४ महिन्यांमध्ये आयसीएमआर प्रमाणित किट्सच्या माध्यमातून जेनपॅथतर्फे कोविड १९ च्या १५ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोविड १९ संदर्भातील चाचण्या व त्यासाठी लागणा-या टेस्टिंग किट्सची निर्मिती या दोन्ही क्षेत्रात कार्यरत असणारी जीनपाथ ही देशातील एकमेव सरकारमान्य संस्था आहे.

चाचण्या करून घेण्यासाठी स्वत:हून नागरिक येत नाहीत

याबद्दल अधिक माहिती देताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल जकातदार म्हणाले, “कोविड १९ विषयक चाचण्या करून घेत असताना त्या कशा असतील याबरोबरच येणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेत भारतात या चाचण्या करून घेण्यासाठी स्वत:हून नागरिक तयार होत नाहीयेत. हेच पहाता या चाचण्या नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि सोप्या व्हाव्यात या उद्देशाने आम्ही हे ड्राईव्ह अप संकलन केंद्र सुरु करीत आहोत. ज्या नागरिकांमध्ये कोविड १९ ची कोणतीही लक्षणे नाहीत अशांसाठी ही संकलन केंद्रे महत्त्वपूर्ण ठरत आहेत.”

जीनपाथ डायग्नोस्टिक्स हे शासन मान्य चाचणी केंद्र असून भारतात कोविड १९ च्या चाचण्या करण्यासंदर्भातील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अॅण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज् यांची मान्यता देखील आम्हाला मिळाली असल्याची माहिती डॉ. जकातदार यांनी या वेळी दिली.