आॅपरेशन ग्रीन अंतर्गत शेतमालासाठी मिळणार अनुदान

कोरोना विषाणूच्या संकटामुळे विस्कळीत झालेली शेतमालाची पुरवठा साखळी सुरळीत करण्यासाठी आत्मनिर्भर योजने अंतर्गत, आॅपरेशन ग्रीन अभियानामध्ये शेतमाल वाहतुकीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.

शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्थांना मिळणार लाभ

पुणे  : कोरोना विषाणूच्या संकटामुळे विस्कळीत झालेली शेतमालाची पुरवठा साखळी सुरळीत करण्यासाठी आत्मनिर्भर योजने अंतर्गत, आॅपरेशन ग्रीन अभियानामध्ये शेतमाल वाहतुकीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने ५०० कोटींची तरतूद केली असून, यासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपनी, आडते (कमिशन एजंट) शेतकरी समुह, पणन फेडरेशन संस्था, सहकारी संस्था, प्रक्रियादार, निर्यातदार पात्र असणार आहे. या योजनेसाठी वैयक्तीक शेतकरी आणि आडतदारांसाठी राज्य कृषी पणन मंडळ नोडल एजन्सी असणार आहे.

याबाबतची माहिती राज्य कृषी मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. पवार म्हणाले,‘‘ कोरोना विषाणू नंतर शेतमाल विपणन साखळी मजबुत करण्यासाठी केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर योजने अंतर्गत शेतमाल साठवणुक आणि वाहतुकीसाठी योजना आखण्यात आली आहे. हि योजना ६ महिन्यांसाठी असून, यासाठी देशाच्या पातळीवर ५०० कोटींची तरतूद केली असून, महाराष्ट्रासाठी वैयक्तीक शेतकरी आणि आडतदारांसाठी राज्य कृषी पणन मंडळा नोडल एजन्सी असणार आहे. तर उत्पादन क्षेत्रापासून ते ग्राहक बाजारपेठे पर्यंत वाहतुक आणि साठवणुकीसाठी ५० टक्के अनुदानाची तरतूद देखील आहे. ‘‘

या योजनेच्या लाभासाठी www.sampada-mofi.gov.in/Login.aspx आॅनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक असून, प्रत्येक लाभार्थ्यास १ कोटी रुपये अनुदान मिळु शकणार आहे. यासाठी विविध घटकांसाठी विविध नोडल एजन्सीचे प्राधिकृत करण्यात आल्या आहेत.

*घटक आणि नोडल एजन्सी

प्रक्रियादार — केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालय

शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था — लहान शेतकऱ्यांचा प्रक्रिया संघ (एस.एफ.ए.सी)

सहकारी संस्था — राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ

वैयक्तीक शेतकरी आणि आडतदार – राज्य कृषी पणन मंडळ

निर्यातदार — अपेडा

राज्य पणन संघ — केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालय

किरकोळ विक्रेते (रिटेलर) — केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालय

-अशी आहे अंतराची अट

– वैयक्तिक शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपनी, आडते (कमिशन एजंट) शेतकरी समुह, सहकारी संस्था, प्रक्रियादार, निर्यातदार यांच्‍यासाठी १०० किलोमिट

– पणन फेडरेशन संस्था आणि रिटेल कंपनीसाठी २५० किलो मिटर

*असे आहे अनुदान

ट्रक – २ रुपये ८४ पैसे प्रति टन प्रति किलोमिटर

वातानुकूलीत वाहन – ५ रुपे प्रति टन प्रति किलोमिटर

*साठवणूक भाडे अनुदान

गोदाम साठवणुक – ३४५ रुपये प्रति टन प्रति हंगाम

शीतगृह साठवणूक – २ हजार रुपये प्रति टन प्रति हंगाम

* या शेतमालाला प्राधान्य

आंबा, केळी, पेरु, किवी, लिची, पपई, लिंबू, अननस, डाळिंब, फणस, घेवडा, कारले, वांगी, ढोबळी मिरची, गाजर, फ्लॉवर, भेंडी, कांदा, बटाटा, टोमॅटो, इतर फळे व भाजीपाला. या व्यतिरिक्त फळे व भाजीपाल्याचा समावेश करावयाचा असल्यास राज्य शासनाची शिफारस घेणे आवश्‍यक असणार आहे.