चार दुकाने अचानक लागलेल्या आगीत भस्मसात

ओतूर(ता.जुन्नर) हद्दीत नगर कल्याण महामार्गालागत पत्रा शेड मध्ये शेजारी शेजारी असलेली चार दुकाने अचानक लागलेल्या आगीत आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी(दि.२८) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली तर आग लागण्याचे कारण मात्र समजु शकले नाही.

वीस लाखावर नुकसानीचा अंदाज

ओतूर : ओतूर(ता.जुन्नर) हद्दीत नगर कल्याण महामार्गालागत पत्रा शेड मध्ये शेजारी शेजारी असलेली चार दुकाने अचानक लागलेल्या आगीत आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी(दि.२८) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली तर आग लागण्याचे कारण मात्र समजु शकले नाही.

या आगीमध्ये चार दुकाने भस्मसात झालेली आहेत या दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे वीस लाखाच्यावर माल जळून खाक झाला आहे.ही आग इतकी भयंकर होती अक्षरशः महामार्गावर आगीच्या झळया लागत होत्या यामुळे आग विझवण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते.जणू या ठिकाणी अग्नी तांडव सुरू होता असे येथील येथील प्रत्यक्षदर्शीनी बोलताना सांगितले आहे. या आगीत व्यावसायिक गणेश चांगदेव थोरात यांचे जय मल्हार फिब्रिकेशन मधील सुमारे तीन लाखाचे इलेक्ट्रिक औजारे व सर्व मशीन जळून खाक झाल्या तर विक्रम रंजन खरात यांचे गणराज ऑटो मोबाईल अँड गॅरेज या दुकानामधील गाड्यांची इंजिन,टायर, बॅटरी आणि स्पेअर पार्ट तसेच गॅरेज मध्ये लावलेली दुचाकी असे चार ते पाच लाखाचे नुकसान तसेच माऊली हुंडेकरी अँड ट्रान्सपोर्ट या गाळ्यामधील बारदान, कांदा बियाणे,कपाटे,लाकडी फर्निचर,केबिन व आतमध्ये लावलेल्या दोन दुचाकी असे चार ते पाच लाखाचे नुकसान,जय मल्हार ऑटो मोबाईल स्पेअर पार्टचे आगीत भस्मसात होवून दहा लाखाच्यावर नुकसान झाले आहे.

या ठिकाणी आग विझवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले,पंचायत समिती सभापती विशाल तांबे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली व आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र आगीची दाहकता एवढी भयाण होती की आग विझवणे कठीण जात होते. आग लागल्याचे समजताच ओतूरचे सरपंच संतोष तांबे,ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली लागलीच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.त्यानंतर रात्री उशिरा आग आणण्यात यश आले. घटनास्थळी जुन्नरचे तहसिलदार हनुमंत कोळेकर,गटविकास अधिकारी हेमंत गरीबे,ओतूरचे मंडलअधिकारी लवांडे,कामगार तलाठी पलांडे यांनी भेट दिली.महसुल विभागाच्या वतीने पंचनामा देखील करण्यात आला आहे.