पंधरा दिवसांत ४० जवानांनी केले प्लाझ्मा दान

ससून सर्वोपचार रुग्णालयात १५ दिवसांत केंद्रीय राखीव पोलीस बल व राज्य राखीव पोलीस बल या दोन्ही राखीव पोलीस बलाच्या ४० जवानांनी प्लाझ्मा दान केले.

ससूनमध्ये प्लाझ्मा दान शिबीर
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात १५ दिवसांत केंद्रीय राखीव पोलीस बल व राज्य राखीव पोलीस बल या दोन्ही राखीव पोलीस बलाच्या ४० जवानांनी प्लाझ्मा दान केले. कोरोनामुक्त झालेल्या ६०-६५ जवानांचे २९ दिवसांनंतर प्लाझ्मा दान करण्यासाठी रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी तब्बल ४० जणांनी गेल्या पंधरा दिवसांत प्लाझ्मा दान केले.बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय, केंद्रीय राखीव पोलीस बल व राज्य राखीव पोलीस बल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लाझ्मा दान शिबीर घेण्यात आले. यासाठी केंद्रीय राखीव पोलीस बलाचे पोलीस महानिरीक्षक संजय लाटकर, डी.एस. रावत, डॉ. मनिष तिवारी आणि राज्य राखीव पोलीस बलाचे आयपीएस अधिकारी माननीय नवीन कुमार रेड्डी, नीवाजी जैन, दिलीप खेडेकर आणि सर्व प्लाझ्मा दानवीर कोरोना योध्दा यांनी खूप सहकार्य केले.ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, रक्तपेढी प्रमुख डॉ. नलिनी काडगी, डॉ. गणेश लांडे, डॉ. पुजा मुन आणि तंत्रज्ञ, कर्मचारी यांनी सहकार्य केले.जवानांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासारखा आणि अनुकरणीय आहे. सामान्यांमधून जे जे कोरोना आजारांतून बरे झाले आहेत आणि एक महिना झाला आहे, त्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी ऐच्छिक पणे पुढे यावे. यासाठी न घाबरता, गैरसमज असतील तर ते दूर करून प्लाझ्मा दानाबाबत समजून घेऊन पुढे यावे आणि प्लाझ्मा दान करून कोरोनामुळे गंभीर प्रकृती झालेल्या रूग्णांना जीवदान द्यावे, असे आवाहन ससून रक्तपेढीतर्फे करण्यात आले आहे.

प्लाझ्मा दान समुपदेशक आणि समन्वयक म्हणून जवानांचे समुपदेशन करून त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार करू शकलो. गणेशोत्सव झाल्यानंतर परत प्लाझ्मा दान करण्यासाठी दोन्ही दलाच्या आणखी शंभरहून अधिक जवानांनी तयारी दर्शवली आहे. बंदोबस्तासाठी रात्रंदिवस अथ्थक परिश्रम घेणारे जवान दुर्दैवाने कोरोना पाॅझिटिव्ह आले. कोरोना महामारीच्या संकटावर मात करून ठणठणीत बरेही झाले आणि गणेशोत्सव बंदोबस्तात जाण्यापूर्वी प्लाझ्मा दान करून त्यांनी अनेक कोरोना रुग्णांचा जीव वाचवला.
– डॉ. शंकर मुगावे, प्लाझ्मा समुपदेशक