सणासुदीत गूळ महागला

सणासुदीच्या काळात गुळाच्या मागणीत वाढ झाली आहे. घाऊक बाजारात गुळाच्या दरात प्रतिक्विंटलमागे २५० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही गुळाचा दर वाढला असून तो ४५ ते ५५ रुपये किलोवरून ५० ते ६० रुपये किलोपर्यंत गेला आहे.

दिवाळीपर्यंत तेजी कायम राहण्याचा अंदाज

पुणे : सणासुदीच्या काळात गुळाच्या मागणीत वाढ झाली आहे. घाऊक बाजारात गुळाच्या दरात प्रतिक्विंटलमागे २५० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही गुळाचा दर वाढला असून तो ४५ ते ५५ रुपये किलोवरून ५० ते ६० रुपये किलोपर्यंत गेला आहे. गुळाच्या दरातील तेजी आणि मागणी दिवाळीपर्यंत कायम राहणार असल्याचे घाऊक बाजारातील गूळ व्यापाऱ्यांनी सांगितले.

गुळाचा सर्वाधिक वापर घरगुती ग्राहकांकडून होतो. गोकुळाष्टमी, गौरी-गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळीत गुळाला मागणी वाढते. सणासुदीमुळे गुळाला मागणी वाढली आहे. त्यामुळे गुळाच्या दरात क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांनी वाढ झाली असून दिवाळीपर्यंत गुळाचे दर तेजीत राहणार आहेत, अशी माहिती मार्केट यार्ड भुसार बाजारातील गूळ व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली. ते म्हणाले,‘ सध्या मार्केट यार्डात गुळाची आवक वाढली आहे. भुसार बाजारात सध्या दररोज चार हजार ढेपांची आवक होत आहे. तसेच गुळाच्या खोक्यांची आवक चार टनांपर्यंत होत आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात गुळाची सर्वाधिक आवक दौंड तालुक्यातील नानगाव, पाटस, केडगाव, यवत, कानगाव, वडगाव येथील गुऱ्हाळातून होत आहे. शिरूरमधील मांडवगण फराटा भागातून चांगली आवक होत आहे. तसेच सांगली, क ऱ्हाड, पाटण भागातूनही गुळाची आवक येथील बाजारात होते.

सेंद्रिय गुळाच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कृषी माल खरेदी-विक्री व्यवहारावरील बंधने शिथिल करण्यात आल्यानंतर व्यापारी थेट शेतक ऱ्यांकडून गूळ खरेदी करत आहेत. बांधावरच व्यापाऱ्यांकडून अन्नधान्य खरेदीचे प्रमाण वाढले असल्याचे गूळ व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले. 

घाऊक बाजारातील गुळाचे दर (क्विंटल) पुढीलप्रमाणे- नं.३- ३६०० ते ३७५० रुपये, नं.२- ३८०० ते ३९००, नं. १- ४००० ते ४१००, गूळ खोके (पाव किलो, अर्धा किलो, एक किलो) दर पुढीलप्रमाणे – गूळ खोक्याचा दर क्विंटलमध्ये- ४००० ते ४८०० रुपये

परराज्यातही मागणी

पुणे जिल्ह्यातील  दौंड तालुक्यातील यवत, केडगाव भागातील गुऱ्हाळे पावसाळ्यातही सुरू आहेत. केडगाव भागातून मुंबई, पुणे, ठाणे, विदर्भ, खानदेश तसेच मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेशात गूळ विक्रीस पाठवला जातो. केडगाव गूळ उत्पादनाचे मोठे केंद्र आहे. तेथील गुऱ्हाळातून देशभर गूळ पाठवला जातो. केडगावमधील गुऱ्हाळांमध्ये दररोज पाचशे ते सहाशे टन गुळाचे उत्पादन घेतले जाते.