विद्यापीठ आवारात मोठी वाहतूक कोंडी

पुण्यात गणेश खिंड रस्त्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू असल्याने औंध-शिवाजीनगर रस्त्यावरील वाहतूक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातून वळविण्यात आली आहे.

पुणे : पुण्यात गणेश खिंड रस्त्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू असल्याने औंध-शिवाजीनगर रस्त्यावरील वाहतूक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातून वळविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या आवारात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ३०० ते ४०० मीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल एक तास लागत असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाच्या बांधणीत अडचणीचा ठरत असल्याने हा उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्यात जाहीर करण्यात आलेल्या १० दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात उड्डाणपूल पाडण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ते काम अजूनही सुरू आहे. अनलॉकमुळे रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. त्यात उड्डाणपूल पाडण्यासाठी मुख्य रस्त्त्यावरील वाहतूक विद्यापीठ आवारातील रस्त्याने वळविण्यात आली आहे. विद्यापीठातील अंतर्गत रस्ते तुलनेत अरुंद आहेत. त्यात वाहनचालक वाहने पुढे दामटण्याचा प्रयत्न करीत असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मुंगीच्या गतीने वाहतूक पुढे सरकत असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. विद्यापीठ परिसरातील वाहतूक कोंडीची परिस्थिती लक्षात घेऊन वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.