मानाच्या  गणपतींनी घेतला मांडव घालण्याचा निर्णय

पुण्यातील मानाच्या पाचही गणेशमंडळांनी मांडव टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्य सरकारच्या निर्देशांच्या अधीन राहून, कोणताही भपकेबाजपणा, भव्यदिव्यता न ठेवता दरवर्षीपेक्षा लहान स्वरूपाचे मंडप टाकण्यात येणार आहे.

आकार केवळ लहान करणार

पुणे  : पुण्यातील मानाच्या पाचही गणेशमंडळांनी मांडव टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्य सरकारच्या निर्देशांच्या अधीन राहून, कोणताही भपकेबाजपणा, भव्यदिव्यता न ठेवता दरवर्षीपेक्षा लहान स्वरूपाचे मंडप टाकण्यात येणार आहे. “अखिल मंडई गणेशोत्सव मंडळा’ने या आधीच उत्सव मंदिरात होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यापाठोपाठ “श्रीमंत दगडूशेठ गणेशोत्सव मंडळा’ने आणि “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळा’ने मंदिरातच उत्सव करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कसबा, जोगेश्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा यांनी मांडव घालण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने दिलेले निर्देश हे मंडप घालूच नका असे नाहीत. ज्या गणेश मंडळांची मंदिरे नाहीत त्यांना मंडप घालू नका असे सुचवले आहे. परंतु मंडपांना विरोध नाही. त्यातून मागील वर्षीच्या परवानगीही यावर्षी महापालिका प्रशासनाकडून तशाच ठेवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मंडप घालण्याचा निर्णय या पाचही मंडळांनी घेतला आहे. मात्र दरवर्षी ज्या धुमधडाक्‍यात आनि भव्यदिव्य स्वरूपात उत्सव साजरा केला जातो, तो यंदा होणार नाही. धार्मिक विधी करून हा उत्सव पार पाडला जाईल असे या गणपती मंडळांच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे.

मानाचा पहिला असलेला कसबा गणपती मंडळाने मंडपाचा साइज कमी करून तो एक तृतियांश केला आहे. गणेशोत्सव साध्या पद्धतीनेच परंतु विविध समाजोपयोगी उपक्रमांनी तो साजरा करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी सांगितले. तर जोगेश्वरी मंडळानेही पाच फुटांनी मंडपाचा साइज कमी करून तो १७ फुटांवरून १२ फुटांवर आणला आहे. खासदार गिरीश बापट यांच्या हस्तेच सोमवारी नारळ वाढवून मंडप टाकण्याला शुभारंभ करण्यात आला. आजूबाजूला दुकाने असल्याने त्यांचा व्यवसाय बंद करता येत नाही. जागाच नसल्याने मंडपातच श्रींची मूर्ती ठेवणे आवश्‍यक आहे. यंदा राज्यसरकारच्या निर्देशाप्रमाणे मंडपाचा साइज कमी केल्याचे जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख राजाभाऊ टिकार यांनी सांगितले. याबाबत फरासखान्यातील पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनाही बोलावून सद्यपरिस्थिती दाखवली आहे. याशिवाय विविध उपक्रम मंडळातर्फे आयोजित केले जाणार असल्याचे टिकार म्हणाले.

गुरूजी तालीम मंडळानेही यंदा लहान मंडप टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी ४० बाय ५० एवढ्या साइजचा मंडप असतो यंदा तो १६ बाय २० चाच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूजी तालीम मंडळाची मूर्ती ज्या ठिकाणी ठेवली जाते ते मंदिर अतिशय छोटे आहे. याठिकाणी एक व्यक्तीही उभी राहू शकत नाही. त्यामुळे मंडप टाकण्याचा निर्णय घेतल्याचे मंडळाचे राजू परदेशी यांनी सांगितले.

मानाचा चौथा असलेल्या तुळशीबाग मंडळाचा गणपती तर अगदी तुळशीबागेतच बसतो. सणांच्या काळात याठिकाणी प्रचंड गर्दी होते. मात्र यंदा या भव्यदिव्यतेला त्यांनी फाटा दिला असून अतिशय साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी ७० बाय ३० फुटांचा मंडप, सजावट, चार कमानी, डेकोरेटिव्ह खांब अशी तुळशीबाग गणपईची शान असते, यंदा मंडपाचा साइज १५ बाय १० करण्यात आला असून, सजावटीला पूर्णपणे फाटा देण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते आरती केली जात होती, यंदा सकाळी आणि संध्याकाळीच ही आरती केली जाणार असून, प्रसादाचेही वाटप होणार नसल्याचे मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर यांनी सांगितले. सॅनिटायझर आणि सुरक्षेचे सर्व उपाय करण्यात येतील असे खटावकर यांनी नमूद केले.