समाजमाध्यमावर मटक्याचे आकडे

कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागातील अवैध धंद्यांना चाप बसला आहे. संसर्गाच्या भीतीमुळे अवैध धंदे करणाऱ्यांनी त्यांचे धंदे बंद केले आहेत. मात्र, अशा परिस्थितीत काही जण समाजमाध्यमातून मटक्याचे आकडे घेत असल्याचे उघड झाले आहे.

 ग्रामीण, शहरी भागात बेकायदा जुगार फोफावला

पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर शहर आणि ग्रामीण भागातील अवैध धंद्यांना चाप बसला आहे. संसर्गाच्या भीतीमुळे अवैध धंदे करणाऱ्यांनी त्यांचे धंदे बंद केले आहेत. मात्र, अशा परिस्थितीत काही जण समाजमाध्यमातून मटक्याचे आकडे घेत असल्याचे उघड झाले आहे. ग्रामीण पोलिसांनी यवत भागात छापा टाकून समाजमाध्यमावरून सुरू असलेल्या मटक्याचा प्रकार उघडकीस आणला आहे.

या कारवाईत पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून महागडी मोटार, रोकड असा पाच लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दत्तात्रय दशरथ चव्हाण (वय ३६, रा. कातरखडक, ता. मुळशी, जि. पुणे),अतिश अंकुश जाधव (वय २२, रा. गोणसरी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी), संदीप बबन चव्हाण (वय ३५, रा. भोर, जि. पुणे), जितेंद्र पंढरीनाथ चव्हाण (वय३२, रा. सहकारनगर, यवत,ता. दौंड, जि. पुणे) यांना अटक केली आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ग्रामीण पोलिसांना दिले आहेत. शहर आणि ग्रामीण भागात व्हॉट्स अ‍ॅपवरून मटक्याचे आकडे घेऊन त्यावर जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती.

आरोपी चव्हाण, जाधव आलिशान मोटारीत फिरत होते. समाजमाध्यमावर आलेले मटक्याचे आकडे ते घेत होते. मटका खेळणाऱ्यांकडून एका अ‍ॅपद्वारे पैसे स्वीकारत होते. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी यवत भागात कारवाई केली. आरोपी जितेंद्र चव्हाण याच्या घरावर छापा टाकला. त्याच्याबरोबर असलेले साथीदार दत्तात्रय चव्हाण, अतिश जाधव, संदीप चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले. तपासात आरोपी मटक्याचे आकडे साताऱ्यातील समीर शेख याला समाजमाध्यमाचा  वापर करून पाठवित असल्याचे निष्पन्न झाले. शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून महागडी मोटार, ४५ हजारांची रोकड तसेच जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड यांनी ही कारवाई केली.

पैशांची देवाणघेवाण अ‍ॅपद्वारे

समाजमाध्यमाचा वापर करून मटका खेळण्याचे प्रमाण शहर आणि ग्रामीण भागात वाढीस लागले आहे. समाजमाध्यमाचा वापर करून मटक्याचे आकडे घेतले जातात. पैसे देण्या-घेण्यासाठी अ‍ॅपचा वापर केला जातो. त्यामुळे अशा ऑनलाइन अवैध धंद्याची माहिती पोलिसांना मिळत नाही. छुप्या पद्धतीने हे व्यवहार सुरू असतात.