पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा मेट्रोची चाचणी

पिंपरी चिंचवडचे स्वप्न असलेल्या मेट्रो प्रकल्पाचे कामकाज लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा नव्याने सुरू झाले आहे. या आधी मेट्रोची पहिली चाचणी यशस्वीरीत्या पर पडली असून आता प्रशासन मेट्रोची दुसरी चाचणी घेण्याच्या तयारीत आहे

पुणे :  पिंपरी चिंचवडचे स्वप्न असलेल्या मेट्रो प्रकल्पाचे कामकाज लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा नव्याने सुरू झाले आहे. या आधी मेट्रोची पहिली चाचणी यशस्वीरीत्या पर पडली असून आता  प्रशासन मेट्रोची दुसरी चाचणी घेण्याच्या तयारीत आहे  दोन कोच असलेली मेट्रो पिंपरी ते फुगेवाडी या ५ किलोमीटरच्या अंतरावर चालवून पाहिली जाईल. येणाऱ्या एक दोन दिवसात ही चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. 

पुण्यात वनाज ते गरवारे महाविद्यालय या प्राधान्य मार्गाचे काम मात्र अद्याप बरेच मागे आहे. हाही मार्ग ५ किलोमीटरचाच आहे. या मार्गावर नळस्टॉप चौकापासून दोन्ही बाजूंना मेट्रोच्या खांबांच्या मध्यभागापासून एक उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. महापालिका त्याचा खर्च करणार आहे. तो निधी मिळाल्यानंतरही हे काम गती घ्यायला तयार नाही. या रस्त्यावर असलेली वाहतूक कामात अडथळा ठरत आहे. त्याशिवाय पौड रस्त्यावरून एसएनडीटी कडे येताना मेट्रोला एक मोठे वळण आहे. त्याच्याही खाबांचे काम अजून बाकी आहे. वनाज, आयडियल कॉलनी, गरवारे महाविद्यालय या स्थानकांचे काम सुरू असले तरी त्यालाही विशेष गती नाही. त्यामुळेच हा प्राधान्य मार्ग मागे पडला असल्याचे दिसते आहे.

कोरोना टाळेबंदीच्या आधीच्या मेट्रोच्या वेळापत्रकात दोन्ही प्राधान्य मार्गाच्या चाचण्या घेण्याचे नियोजन होते. टाळेबंदीने सगळेच वेळापत्रक कोलमडले. तरीही पिंपरी चिंचवडच्या प्राधान्य मार्गाचे काम पुढे गेले व पुण्यातील काम मात्र मागे पडले आहे.