श्रीराम मंदिर निर्मितीसाठी एमआयटीकडून २१ कोटींची मदत

पुणे : भारताची आध्यात्मिक राजधानी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे निर्माण होणार्‍या प्रभू श्रीराम मंदिराच्या पवित्र कार्यासाठी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,पुणे, महाराष्ट्रकडून कारसेवेच्या रूपात या पवित्र कामात योगदानासाठी २१ कोटी रूपयांच्या धनराशीची मदत करण्यात येईल.

पुणे : भारताची आध्यात्मिक राजधानी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे निर्माण होणार्‍या प्रभू श्रीराम मंदिराच्या पवित्र कार्यासाठी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,पुणे, महाराष्ट्रकडून कारसेवेच्या रूपात या पवित्र कामात योगदानासाठी २१ कोटी रूपयांच्या धनराशीची मदत करण्यात येईल. अशी घोषणा अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पूर्व संध्येला गणेश पूजन झाल्यानंतर आयोजित केल्या गेलेल्या एका पत्रकार परिषदेत श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी आज केली. यावेळी श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महन्त नृत्यगोपालदासजी महाराज देखील उपस्थित होते. 

– ज्ञानज्योती रूप कळस उभारला जावा

माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटीचे प्रमुख पद्मभूषण डॉ. विजय भटकर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून ही राशी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,पुणे, एमआयटी आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, लोणी काळभोर,अंवंतिका विद्यापीठ, उज्जैन, मध्यप्रदेश, इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हरसिटी, पुणे आणि माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह येथील सुमारे ७५ हजार विद्यार्थी, ५ हजार शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून या पवित्र कामाच्या योगदानासाठी सुमारे २१ कोटी रूपयांच्या धनराशीची मदत करण्यात येईल.

अयोध्या येथे भगवान श्रीराम मंदिर निर्मितीमध्ये संस्थेचा हातभार लागावा म्हणून श्रीराम मंदिरातील सुंदर गर्भगृहाची निर्मिती शुभ्रधवल व सर्वोत्तम गुणवत्तेच्या मकराना संगमरवरामध्ये संस्थेतर्फे केली जाणार आहे. या भव्य गर्भगृहाचा आकार ३० फूट बाय ३० असा असेल. या गर्भगृहामध्ये १५ फूट उंचीचे १२ खांब असतील. जमीनपासून २७ फूट उंचीचा सुवर्णजडीत ज्ञानज्योती रूप कळस उभारला जावा अशी संकल्पना देखील मांडण्यात आली आहे.