जम्बाे रुग्णालयासाठी महापािलका देणार ७५ कोटी

राज्य शासनाच्यावतीने कोरोनावरील उपचारासाठी सुरू करण्यात येत असलेल्या तीन जंबो कोविड रुग्णालयासाठी पुणे महापालिकेच्या हिश्श्याचे ७५ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

खर्चास स्थायी समितीची मान्यता

पुणे : राज्य शासनाच्यावतीने कोरोनावरील उपचारासाठी सुरू करण्यात येत असलेल्या तीन जंबो कोविड रुग्णालयासाठी पुणे महापालिकेच्या हिश्श्याचे ७५ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तातडीने तपासणी करण्यासाठी आणखी एक लाख अँन्टीजेन किटस् खरेदी करण्याचा निर्णय आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

     कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून राज्य शासनाने उपचारासाठी तीन जंबो कोविड हॉस्पीटल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये उभारण्यात येणार्‍या या कोविड हॉस्पीटल उभारणीची जबाबदारी पीएमआरडीए कडे देण्यात आली आहे. या तीनही हॉस्पीटलसाठी साधारण २६० कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी दोन्ही महापालिका २५ टक्के निधी देणार आहे. पुणे शहरातील सीओईपी महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात येणार्‍या हॉस्पीटलचे काम सुरूही झाले आहे. ठेकेदाराला या कामाची आगाउ रक्कम देण्यासाठी पुणे महापालिकेने ५० कोटी रुपये निधी पीएमआरडीकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव आज मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता.

    यासोबतच सीओईपी महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात येणार्‍या कोविड हॉस्पीटलसाठी आवश्यक साधनसामुग्री, औषधे, प्रयोगाशाळा तपासण्या, एक्स रे, कपडे, धुलाई, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आदी बाबींच्या निविदा महापालिकेकडून राबविण्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधीच्या खर्चासही आज स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

आणखी १ लाख अँन्टीजेन किटस् ची खरेदी

कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांची तातडीने तपासणी करून संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेेने मागील महिन्यांत एक लाख अँटीजेन कीटस् खरेदी केल्या आहेत. अँटीजेन किटस्द्वारे करण्यात येत असलेल्या तपासणीचा अहवाल अर्धा तासात प्राप्त होत असल्याने मागील महिन्याभरामध्ये संसर्ग झालेले रुग्ण शोधण्यात मदत झाली. परंतू या कीटस् संपत आल्याने आरोग्य विभागाने आणखी १ लाख किटस् खरेदीसाठी निविदा अल्पमुदतीची निविदा राबविली होती. या निविदेला मान्यता देण्यात आली आहे. यासाठी ४ कोटी ५९ लाख रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती हेमंत रासने यांनी दिली.