केसरी गणेशोत्सवाच्या श्रींचे ऑनलाइन दर्शन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानाचा केसरी गणेशोत्सव यावर्षी अतिशय साधेपणाने साजरा केला जाणार असून भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी केसरी गणेशाच्या दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करण्यात येणार आहे. केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक आणि विश्वस्त सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक यांनी ही माहिती दिली.

यंदा उत्सव साधेपणाने

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानाचा केसरी गणेशोत्सव यावर्षी अतिशय साधेपणाने साजरा केला जाणार असून भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी केसरी गणेशाच्या दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करण्यात येणार आहे. केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक आणि विश्वस्त सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक यांनी ही माहिती दिली.
१८९४ पासून केसरी गणेशोत्सवाला सुरुवात झाली. सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते असणार्‍या लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला केसरी गणेशोत्सव लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि व्याख्याने हे केसरी गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे. यावर्षी कोरोनाच्या महासंकटामुळे व्याख्याने होणार नाहीत. सध्याच्या संकटाच्या काळात अनेक रक्त पेढ्यांना रक्ताचा तुडवडा जाणवत आहे. हे लक्षात घेऊन शनिवार दि. २९ आणि रविवार दि. ३० ऑगस्ट असे दोन दिवस केसरी गणेशोत्सवात रक्तदान शिबीर घेण्यात येईल. दोन्ही दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिबिराची वेळ असून रक्तदात्यांना प्रमाणपत्र तसेच रक्तपेढीचे सवलत कुपन देण्यात येणार आहे. केसरीवाड्यात हे शिबीर होईल.
शालेय विद्यार्थ्यांसाठी कॉमिक स्ट्रिप स्पर्धा चार गटांत आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षी केसरीवाड्यात स्पर्धा होते. त्याऐवजी यंदा कॉमिक स्ट्रिप घरीच तयार करुन स्पर्धकांनी त्या केसरी कार्यालयात आणून द्यावयाच्या आहेत. सामाजिक अंतर पाळून आणि व्यक्तिगत सुरक्षिततेची संपूर्ण खबरदारी घेऊन महिलांसाठी २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत केसरीवाड्यात पाककृती स्पर्धा होतील, अशी माहिती केसरी गणेशोत्सवाच्या संयोजिका डॉ. गीताली टिळक यांनी दिली.
वेदमूर्ती परशुराम परांजपे आणि त्यांच्या सहकार्‍यांकडून होणारा गणेश याग हे यंदाच्या केसरी गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. मिरवणूक न काढता पालखीतून ‘श्रीं’ ची मूर्ती केसरीवाड्यात आणली जाईल. डॉ. रोहित टिळक आणि डॉ. प्रणति टिळक यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्यानंतर मानाच्या चौथ्या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांकडून श्रींची आरती होईल. कोरोनामुळे श्रींचे प्रत्यक्ष दर्शन भाविकांना शक्य होणार नसले तरी त्यांच्यासाठी ऑनलाइन दर्शनाची खास व्यवस्था केसरी गणेशोत्सवाने केली आहे. गणेशोत्सवात दरवर्षी होणारा पानसुपारी समारंभ रद्द करण्यात आला आहे.